जळगाव : मंत्री गिरीश महाजन यांनी जे वक्तव्य केले आहे, ते वक्तव्य म्हणजे रक्षा खडसे यांच्यावर तसेच माझ्या कुटुंबावर संशय व्यक्त करणारे आहे. या वक्तव्यामुळे माझ्या परिवाराला अत्यंत वेदना झाल्या आहेत आणि अत्यंत दु:ख झाले आहे. पत्नी मंदा खडसे, सून रक्षा खडसे आणि कुटुंबीय तसेच नातेवाईक यांना या वक्तव्यांमुळे मोठा धक्का बसला असून आम्हा सर्वांच्या भावना दुखावल्या आहेत, असे मत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.
आपण गिरीश महाजन यांच्या मुलींबाबत कधीही वक्तव्य केले नाही. तथापि, गिरीश महाजनांनी आपल्या मुलाच्या आत्महत्येबाबत प्रतिक्रिया देऊन मला वेदना दिल्या आहेत. माझे जीवन जे काही आहे ते महाराष्ट्राच्या समोर आहेच. गिरीश महाजन यांच्या देखील अनेक गोष्टी आम्हाला माहित आहेत. फर्दापूर प्रकरणाचा तर मी साक्षीदार आहे. मात्र आम्ही याचा कधीही उल्लेख केला नाही. अशा शब्दांमध्ये एकनाथ खडसे यांनी आज मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या टिकेचा समाचार घेतला.
तर खुशाल चौकशी करा..
गिरीश महाजन सत्ताधारी असून सर्व तपास यंत्रणा त्यांच्याकडे आहेत. त्यांनी या प्रकरणाची खुशाल चौकशी करावी. या प्रकारचे वक्तव्य म्हणजे गिरीश महाजन नीच आणि हलकटपणाचा कळस आहे. राजकीय द्वेषातून माणूस किती खाली जावू शकते, याचे उदाहरण म्हणजे महाजन यांचे वक्तव्य आहे. हा सत्तेचा माज आणि मस्ती असून जनता हा माज खाली उतरविल्याशिवाय राहणार नाही, असा निशाणा एकनाथ खडसे यांनी यावेळी गिरीश महाजन यांच्यावर साधला.
राजकारणाची पातळी घसरली
गेल्या ४० वर्षापासून मी राजकारणात आहे, मात्र एवढ्या घाणेरड्या स्तरावरच राजकारण केले नाही. विषारी टीका करायचो, पण विचार करुन करायचो, एखादा शब्द चुकीचा बोलला गेला तर आम्ही माफी मागायचो. एवढ्या चार वर्षात राजकारणाची पातळी खूप घसरली आहे आणि आता त्याने कळस गाठला. गिरीश महाजनांच्या वक्तव्यामुळे माझ्या मित्रपरिवारातून फोन येत असून ते तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहेत, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.