सोलापूर राजमुद्रा वृत्तसेवा | मराठा आरक्षणासाठी 4 जुलै रोजी सोलापुरात उग्र मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातील हा सर्वात मोठा मोर्चा राहणार असल्याचं सांगतानाच 4 जुलै रोजी सोलापूरच्या प्रत्येक तालुक्यात रास्ता रोको करण्यात येणार आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी आम्ही हा मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.
त्यामुळे येत्या 4 जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाची माहिती दिली. कोल्हापूरनंतर आता सोलापुरात हा मोर्चा निघणार आहे. केवळ मराठा समाजच नाही तर शेतकरीही या मोर्चात सहभागी होणार आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होईल. लोकप्रतिनिधींशी चर्चा करूनच हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं पाटील यांनी सांगितलं.