जळगाव : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार पाडून शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले. आघाडी सरकारने घेतलेले लोकहिताचे निर्णय या सरकारकडून रद्द केले जात आहे. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी जनतेमध्ये सरकारप्रती तीव्र रोष असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केली.
जिल्हा वार्षिक योजना वर्ष 2023-24 यासाठी तब्बल 569 कोटी 80 लक्ष रूपयांची तरतूद असणार्या प्रारूप आराखड्याला जिल्हा नियोजन मंडळाच्या सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्हा विकासासाठी अजून 75 ते 100 कोटी रूपयांची अतिरिक्त तरतूद करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
भाजपचा अजेंडा राबविण्याच प्रयत्न
जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपल्यानंतर आमदार अनिल पाटील यांनी निधी वाटपाबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच विकासकामांमध्ये दुजाभाव होत असल्याचा आरोप केला आहे. राज्यात भारतीय जनता पार्टीने शिवसेनेची तोडफोड केल्यानंतर जे सरकार स्थापन केलंय त्याच्यात प्रामुख्याने शिंदे गटाचे जे ४० आमदार आहेत. मात्र, त्यांचे फार काही चालत नाही. भाजपचा अजेंडा मुख्यमंत्र्यांकडून राबवला जात आहे. ज्या दिवसापासून भाजप सरकार आलं त्या दिवसापासून शेतकरी, कष्टकरी आणि कामगार यांच्यावर सातत्याने अन्याय होत असून, सरकारप्रती अविश्वासाचे वातावरण निर्माण होत आहे. अशा शब्दात आमदार पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे.