मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेण्यासाठी फिरत आहेत. अशात त्यांच्या हत्येचा कट आखला जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांना हा धमकीचा मेसेज आला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांकडून हा मेसेज आल्याची सूत्रांची माहिती आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वाहतुक पोलिसांच्या हेल्पलाईनवर काल (दि. 21) रोजी एक संबंधित व्हॉट्सअॅप मेसेज प्राप्त झाला होता. त्यात सात ध्वनिफीत असून संबंधित व्यक्ती हिंदीमध्ये बोलत होता. त्या संबधित व्यक्तीने दावा केला होता की, ”अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे दोन हस्तक मुस्तफा अहमद व नवाज हे असून ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट आखत आहेत. तसेच हे हस्तक देशाला बर्बाद करण्याच्या प्रयत्नात असल्याचेही त्याने म्हटले होते. यात काही ऑडिओ क्लीप आणि काही फोटोंचा समावेश आहे.
मुंबई क्राइम ब्रांच अलर्ट
पीएम मोदींना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांची क्राइम ब्रांच सतर्क झाली आहे. पोलिसांकडून मेसेज पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. एका हिरे व्यापाऱ्याची चौकशी करण्यात आली आहे. याचे कारण म्हणजे व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये एक फोटोही पाठवण्यात आला आहे. हा फोटो सुप्रभात वेळ नावाच्या व्यक्तीचा आहे. ही व्यक्ती संबंधित हिरे व्यापाऱ्याकडे काम करायची. त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते.
अनेकदा धमक्या आल्या आहेत
मुंबई पोलिसांना सातत्याने अशा धमक्या येत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात एक धमकीचा फोन आला होता. पाकिस्तानातून आलेल्या या कॉलमध्ये 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती. त्याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याशिवाय, अशाच आणखी एका कॉलमध्ये अंधेरीतील इन्फिनिटी मॉल, जुहूमधील पीव्हीआर आणि सांताक्रूझमधील फाइव्ह स्टार हॉटेल सहार यांना बॉम्बची धमकी देण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या 112 या हेल्पलाइन क्रमांकावर हा कॉल आला होता.