मुंबई : राज्यातील शिंदे सरकार पडणार, लवकरच मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचे संकेत महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी दिले आहेत. मात्र खुद्द भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांनीही राज्यातील स्थिती गोंधळलेली असल्याचं म्हटलंय. दानवे यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा मध्यावधींचे वेध लागले आहेत. तर, शिवसेना खासदार संजय राऊतांनी दावनेंच्या विधानावरुन, हे सरकार 100 टक्के पडणार असल्याचा दावा केला आहे.
संजय राऊत म्हणाले, भाजप नेते रावसाहेब दानवे यांनीच आता येत्या दोन महिन्यांत राज्यात मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले आहेत. रावसाहेब दानवे कधी कधी चुकून खरे बोलून जातात. त्यामुळेच त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर बोलताना कधी काय होईल याचा नेम नाही, असे बोलून मध्यावधीचे संकेत दिले आहेत, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. माझ्या मनात तर हे शिंदे सरकार लवकरच पडणार, याबद्दल तिळमात्र शंका नाही. तसेच, याबाबतची काही महत्त्वाची माहितीही माझ्याकडे आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
काय म्हणाले होते दानवे?
काल कन्नड येथील सभेत रावसाहेब दानवे म्हणाले होते की, ‘महाविकास आघाडीचे सरकार जाईल असे कुणालाही वाटत नव्हते. मात्र अशी जादू झाली की अडीच वर्षात सरकार कोसळले. यामुळे उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येत नाही. सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही.’ रावसाहेब दानवेंच्या याच वक्त्यावरुन खासदार संजय राऊतांनी शिंदे सरकारला टोला लगावला आहे.
जामीन मिळाल्यानंतर राऊतांची दिल्लीवारी
येत्या काही दिवसांत शिंदे फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसर टप्पा पार पडणार आहे. मात्र या सरकारमध्ये मोठ्याप्रमाणात नाराजी नाट्य रंगत असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राऊतांनी हा दावा केल्याची चर्चा आहे. गोरेगाव पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी जामीन मिळाल्यनंतर शिवसेना खासदार संजय राऊत पहिल्यांच दिल्लीत गेले. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांना भेट असल्याची चर्चा आहे. मात्र राऊतांनी दिल्लीत पक्षाच्या आणि इतर कामांसाठी आलो आहे. असं म्हटले आहे.