जळगाव : जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्या. जळगावची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच सदर दुध संघात झालेल्या अखाद्य तूप अपहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून त्यात संघाचे कार्यकारी संचालक, प्रशासन अधिकारी व इतर अधिकारी-कर्मचारी यांना अटक झाली आहे. आता या प्रकरणात आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्राने खळबळ उडाली आहे. चेअरमन व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दूध संघाकडून शेतकऱ्यांचे ९ कोटींचे पेमेंट थकले असून सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) यांनी लक्ष घालण्याची आमदार मंगेश चव्हाण यांनी केली आहे.
दुध संघातील प्रशासनाने संघाच्या दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून योग्य ती कार्यवाही करणे क्रमप्राप्त होते. तसेच कार्यकारी संचालक पदाचा कार्यभार संघातील इतर तत्सम अधिकाऱ्याकडे देणे आवश्यक होते. आचार संहिता असताना सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे चेअरमन यांच्याकडे असतात तरी सुद्धा त्यांनी याची दखल घेतलेली दिसत नाही. दुध संघाचे चेअरमन व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सद्यस्थितीत शेतकऱ्यांचे दुधाचे ९ कोटींचे पेमेंट थकले आहे तसेच इतर दूध संकलन व वितरण करणारी वाहने यांचे पेमेंट थकीत झाले आहे, तरी संघाच्या चेअरमन व प्रशासनातील अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे दुध संघातील दैनंदिन कामकाज, दुध उत्पादक शेतकरी व संस्था यांना येणाऱ्या वरील अडचणींची आपण तत्काळ दखल घेत दैनंदिन कामकाज सुरुळीत होण्याकरिता संबंधितांना निर्देश द्यावेत असे पत्रच चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) जळगाव यांना दिले आहे.
दैनंदिन कामकाजावर विपरित परीणाम
पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, दुध उत्पादकांचे पेमेंट दर महिन्याच्या १, ११, २१ तारीख अश्या दशकाच्या बिलींग सायकलमधे होत असते. तसेच दुध संकलन व दुध वितरणच्या ट्रान्स्पोर्ट पेमेंट महिन्याला ८, १८, २८ तारखेला ला होणे अपेक्षित आहेत. तसेच दुध संकलन करणारी व वितरण करणारी वाहने यांचे पेमेंट थकीत असल्यामुळे वाहतुक ठेकेदार हवालदिल झाले आहेत. तसेच दैनंदिन देयकांवर सह्यांचे अधीकार कुणालाही दिले नसल्यामुळे संघाला सर्व प्रकारचे साहित्य पुरवणारे ठेकेदार यांचे पेमेंट होत नसल्यामुळे त्याचादेखील दैनंदिन कामकाजावर विपरित परीणाम होत आहे. याबाबत माझ्याकडे दुध उत्पादक शेतकरी, संस्था यांनी तक्रारी केल्या असल्याचे देखील त्यांनी नमूद केले आहे.