पुणे : पहिला प्रेम विवाह झालेला असतानाही तरुणाचा दुसऱ्या मुलीवर जीव जडला. तिच्यासोबत लग्न करण्यासाठी तरुणाने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला जबरदस्ती घातक औषध देऊन तिचा खून केल्याचं उघडकीस आलं आहे. ही घटना मुळशी तालुक्यामध्ये घडली असून या नराधम पतीला पौड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोटावडे फाटा (ता. मुळशी) येथे एका आय.सी.यु. वॉर्डमध्ये स्वप्निल विभिषण सावंत (वय 23) हा काम करीत होता. काही दिवसांपूर्वी प्रियांका क्षेत्रे (वय 22) या युवतीसोबत त्याचा प्रेमविवाह झाला होता. गेल्या पाच महिन्यांपासून कासार आंबोली (ता. मुळशी ) येथे भाड्याने खोली घेऊन ते दोघेही राहत होते. परंतु दरम्यानच्या काळात स्वप्नील सावंतचे हॉस्पिटलमधील परिचारिका असलेल्या एका मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. तेव्हा तो तिच्यासोबत दुसरे लग्न करण्याचे स्वप्न पाहू लागला.
बीपी, शुगरचे इंजेक्शन देऊन केली हत्या
मात्र पहिले लग्न झाले असताना दुसरे लग्न करणार कसे या प्रश्नाने त्याला सतावून सोडले होते. त्यानंतर स्वप्नील हॉस्पिटलमधून बीपी आणि शुगरचे इंजेक्शन आणून तिला जबरदस्ती देत राहिला. त्याने तिला त्रास देऊन तिला घरातच मारुन टाकले. तिला उपचारासाठी नेत असल्याचा खोटा बनाव केला. मात्र डॉक्टरांना याचा संशय आल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. याबाबत प्रियांकाच्या कुटुंबीयांनी स्वप्नील विरुद्ध मानसिक छळाचा गुन्हा दाखल आहे. स्वप्नील हा प्रियांकाला संपवण्यासाठी हॉस्पिटलमधून गुपचूप औषधे नेत होता. तिला बीपी शुगरचा त्रास नसतानाही तिला ती इंजेक्शन देऊन त्याने मारून टाकले, असे तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पौड पोलीस करत आहेत.