मुंबई: राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. या सत्तांतरानंतर भाजपा आणि शिंदे गटाला शह देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून नियोजनबद्ध पावले टाकण्यात येत आहे. मुंबईत एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
मागील अनेक दिवसांपासून शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित आघाडी सोबत येणार असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी आपण उद्धव ठाकरेंना प्रस्ताव पाठविला असल्याचं सांगितलं आहे. मात्र ठाकरे गट महाविकास आघाडीमध्ये असल्यानं काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेकडेही सर्वांचं लक्ष लागलं होतं. परंतु काँग्रेससोबत आपली चर्चा झाल्याचं आंबेडकर यांनी यापूर्वी अनेकदा सांगितलं होतं. त्यामुळे सर्वांच्या नजरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेकडे लागल्या होत्या. अशाच आता, समविचारी लोक एकत्र येऊन समोरच्या सत्ताधारी पक्षाचा पराभव करण्यासाठी मतविभागणी होत नसेल तर आमची तयारी आहे, असं म्हणतं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वंचित बहुनज आघाडीसोबत आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही अनुकुल असल्याचं सांगितलं आहे.
अजित पवार काय म्हणाले?
अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना वंचित बहूज आंबेडकर गट, गवई पक्ष, आठवले गट, कवाडे गट आहेत. गट म्हणण्यापेक्षा पक्ष आहेत. रामदास आठवले तिकडे जाऊन मंत्री होई पर्यंत आम्ही सोबत निवडणुका लढवल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आमच्या त्या त्यावेळच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केली होती. दिवंगत नेते आर. आर. पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली होती. त्याबद्दल त्यांनी तशी माहिती दिली होती. समविचारी पक्षांची मतविभागणी होऊ नये यासाठी आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंची आंबेडकरांना साद
“देशात लोकशाही टिकवण्यासाठी, स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी केवळ लोकांना जागे करुन चालणार नाही. तर, यासाठी एकत्र येऊन काम करण्याची वेळ आली आहे. देश गुलामगिरीकडे चालला असताना आपण नुसते बघत राहणार असू तर आपल्याला आजोबांचे नाव घेण्याचा अधिकार राहणार नाही,” असे सांगत उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकर यांना साद घालत नवीन राजकीय समीकरणाचे संकेत दिले होते.