मुंबई : मूल झाल्यावर जगातील प्रत्येक जोडप्याला आई-वडील होण्याच्या आनंदाला सीमा नसते, भारतात मुलांना जन्म देणाऱ्या महिलांना बाळाची काळजी घेण्यासाठी विशिष्ट महिन्यांची प्रसूती रजा दिली जाते, तर जे पुरुष पिता बनतात, त्यांना मात्र क्वचितच सुट्टी दिली जाते. त्यामुळे आपल्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी एका बापाने चक्क लाखो रुपयांची नोकरी सोडली आहे. ही बातमी समोर येताच सर्व नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) खरगपूरचे माजी विद्यार्थी अंकित जोशी यांनी सांगितले की, आपल्या नवजात मुलीसोबत वेळ घालवण्यासाठी त्यांनी लाखोंची नोकरी सोडली आहे. ते एका कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष होते. ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत अंकित जोशींनी आपल्या निर्णयाबद्दल सांगितले. ते म्हणाले की, माझ्या मुलीच्या जन्माच्या काही दिवस आधी मी माझी उच्च पगाराची नोकरी सोडली. मला माहित आहे की हा एक विचित्र निर्णय होता. लोकांनी मला आधीच सांगितले होते की पुढे गोष्टी कठीण होतील, पण माझ्या पत्नीने निर्णयाला पाठिंबा दिला.
त्यामुळे घेतला नोकरी सोडण्याचा निर्णय
अंकित जोशी यांनी स्पष्ट केले की कंपनीत वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून त्यांना वारंवार प्रवास करावा लागायचा. मुलगी स्पितीच्या जन्मानंतर ती गोष्ट त्यांना करायची नव्हती. त्यामुळे माझी मुलगी जगात येण्यापूर्वीच मी ठरवले होते की मला माझा सर्व वेळ तिच्यासोबत घालवायचा आहे. त्यांना कंपनीतून आठवड्याभराची सुट्टी मिळणार नव्हती. त्यामुळे त्यांनी थेट नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. नोकरी सोडल्यापासून जोशी यांनी आपला वेळ स्पितीची काळजी घेण्यासाठी दिला आहे.
पत्नीला नोकरीत मिळाली पदोन्नती
या कंपनीत अंकितला फार काळ झाला नव्हता. त्याने नव्यानेच ही जबाबदारी घेतली होती. पण मुलीच्या आगमानाने त्याने या नोकरीचा राजीनामा दिला. मुलगी स्पितीच्या जन्माच्यावेळी आणि तिच्या लहानपणी तिला वेळ देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले. स्पितीच्या संगोपणात या जोडप्याचा एक महिना कसा निघून गेला, ते त्यांनाच कळले नाही. दरम्यान पत्नी आकांक्षाला स्पितीच्या जन्मानंतर नोकरीत पदोन्नती मिळाली. तर अंकितने अजूनही नवीन नोकरीसाठी अर्ज केलेला नाही.