जळगाव राजमुद्रा | जिल्ह्यात सध्या वाळू माफियांच्या हैदोस दिवसेंदिवस वाढत आहे. यंत्रणेतील म्होरक्यांना याबाबतची परिपूर्ण माहिती आहे. मात्र अर्थपूर्ण मैत्री असल्याने मुंग गिळून बसण्याची भूमिका घेतली आहे. तालुका परिसरात मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन सुरू आहे
. गेल्या काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी खुद्द नदीपात्रात उतरून दोन वाढवा नंबर जप्त करीत कारवाई केली होती. मात्र तरी देखील अद्यापपर्यंत वाळू उत्खनन थांबलेले नाही.
वाळू वाहतुकीला आळा बसण्यासाठी महसूल प्रशिक्षणाच्या वतीने काही अधिकारी व तलाठी वर्गाच्या रात्रपाळी नियुक्त्या नदीपात्रात करण्यात आल्या आहे. मात्र रात्रीच्या अंधारात शासकीय लोकेशन देण्यापुरताच अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या मर्यादित राहिल्या आहे. आर्थिक हितसंबंध जोपासणाऱ्यां म्होरक्यांमुळे महसूल विभागातील काही प्रामाणिक अधिकारी देखील यामध्ये भरडले गेल्याचे समजते आहे
.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सुटीची माफियांना लागली चुणूक
जिल्हाधिकारी रजेवर जाणार याबाबतची चुणूक देखील वाळू माफियांमधील महसुलाच्या काही अधिकाऱ्याच्या जवळच्यांना लागली आहे. “जिल्हाधिकारी अमन मित्तल हे त्यांच्या कुटूंबिक कार्यक्रमात व्यस्त आहेत. तोपर्यत काय कमवायचा ते कमावून घ्या”, असा देखील सल्ला तहसील कार्यालयातील एका अधिकाऱ्याने दिल्याची जोरदार चर्चा आहे.
अधिकाऱ्यांचा वरदहस्त
आता अधिकाऱ्याचा आशीर्वाद म्हटल्यावर वाळूची वाहने थांबणार कशी? “फक्त त्या तालुकावाल्यांचे काय असेल ते बघून घ्या भाऊ, बाकी आपण आहेच”. असा दिलासा वजा तोंडी वटहुकूम दिल्याची चर्चा रंगत आहे. आव्हाने, आव्हानी, खेडी, फुगनगरी, दोनगाव याच्या आजूबाजूच्या परीसरात वाळूची वाहने भरधाव वेगाने जात असल्याचे दिसून येते. ह्याच भागातील पात्रातून मोठ्या वाळूची वाहतूक होत आहे.
भरधाव ट्रॅक्टरांची दहशत
गेल्या दाेन दिवसापासून वाळू तस्करांनी गिरणा नदीपात्राकडे आपला माेर्चा वळवला आहे. मध्यरात्रीनंतर नदीतून वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टर गॅंगमुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. भल्या पहाटेनंतर शहरात वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरांची दहशत आहे.
महामार्गावर ट्रॅक्टरांची रांग
गिरणा पात्रातून वाळू उपसा करणारे १५० पेक्षा अधिक ट्रॅक्टर सध्या रात्रीच पात्रात उतरत आहेत. शहरातील विविध भागांमध्ये वाळू टाकून पुन्हा भरधाव वेगाने हे ट्रॅक्टर नदीपात्राकडे येत आहेत. ट्रॅक्टरांची संख्या अधिक असल्याने रात्रीच्या महामार्गावर एकाच वेळी मागाेमाग १० ते १५ ट्रॅक्टरांची रांग लागलेली असते.