अर्जुन आणि सुभद्राचा मुलगा अभिमन्यू यांच्याबद्दल प्रत्येकाने ऐकले असेलच की, अभिमन्यूने आईच्या गर्भातच चक्रव्यूह तोडण्याची कला कशी शिकली. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या 8 वर्षीय रियाचा आहे. छोटी रिया संस्कृतमधील अतिशय कठिण समजल्या जाणाऱ्या महेश्वर सूत्रापासून शिव तांडवपर्यंत सर्व काही सांगते. इतिहास, सामान्य ज्ञान, गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांशी संबंधित प्रश्नांची उत्तरेही ती मुक्तपणे देते. त्यामुळे रिया गुगल गर्लच्या नावाने चर्चेत आली आहे.
8 वर्षीय रिया हिचे ज्ञान गुगलपेक्षा कमी नाही. रियाला जगातील खंड, महासागरांची नावे, जगभरातील देश, त्यांच्या राजधानी आणि चलने, भारताची राज्ये आणि राजधान्या तोंडीपाठ आहेत. रियाला भारतातील सर्व जिल्हे, भारतातील सर्व प्रमुख बंदरे, प्रमुख राष्ट्रीय उद्याने, भारतात वाहणाऱ्या प्रमुख नद्या, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांची नावे लहानपणापासूनच लक्षात आहेत. रिया भारताचे शेजारी देश आणि सीमारेषेचीही माहिती ठेवते. रियाला तुर्किक राजवंश, गुलाम आणि मुघल घराण्यातील सर्व शासकांची नावे देखील आठवतात. रिया महेश्वर सूत्र, शिव तांडव आणि गीतेच्या सर्व श्लोकांचे न पाहता पठण करते. त्यामुळेच आता लोक तिला गुगल गर्ल म्हणू लागले आहेत. लोकांना असे वाटते की रियाने प्रत्येक विषयात पीएचडी केली आहे.
बालपणापासून वाचनाची आवड
रियाचे वडील रामधन तिवारी, जे प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, ते सांगतात की, ती 2 वर्षांची असतानाच तिने पुस्तके वाचायला सुरुवात केली. रिया जे काही पुस्तक पाहायची ते पूर्ण वाचायचा प्रयत्न करायची. तिच्या कुतूहलाशी संबंधित प्रश्नांची उत्तरेही ती द्यायची. तीक्ष्ण स्मरणशक्तीमुळे तिला एकदा वाचलेला विषय आठवतो. कबीर, तुलसीदास, सूर्यकांत त्रिपाठी निराला, सूरदास आणि पंतप्रधान मोदी यांचा जीवन परिचयही रियाच्या तोंडपाठ आहे. तिसरीत शिकणारी रिया इंटरमिजिएटपर्यंत सहज पुस्तके वाचू शकते. या वर्षी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील 50% पेक्षा जास्त प्रश्न रियाने सहज सोडवले. रियाचे टॅलेंट पाहून लोकांना आश्चर्य वाटते.
शिक्षण विभागाची मदत मिळणार
दुसरीकडे जिल्हा शिक्षणाधिकारी अखिलेश प्रताप सिंह म्हणतात की, रियासारखी प्रतिभावंत मुलगी जिल्हा परिषदेच्या शाळेत असणे ही मूलभूत शिक्षण विभागासाठी अभिमानाची बाब आहे. लवकरच मी या मुलीला भेटणार असून विभागीय स्तरावरुन जी काही सोय असेल ती तिच्यासाठी उपलब्ध करून दिली जाईल. जेणेकरून ती पुढे जाऊन कुटुंबासह विभागाचा नावलौकिक मिळवू शकेल.