मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल आता पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी चप्पल घालून 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना अभिवादन केले. त्यांच्या या कृतीमुळे जोरदार टीका करण्यात येत आहे.
आज मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याला 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या हल्ल्यातील शहिदांना विविध ठिकाणी श्रद्धांजली वाहिली जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण केले. तसेच मुंबईतील अतिरेकी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पायात चप्पल घालूनच हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्यापाल चप्पल घालून शहिदांना श्रद्धांजली वाहत असल्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे. तसेच राज्यपालांच्या या कृतीवर संतापही व्यक्त केला आहे.
काय म्हणाले सचिन सावंत?
सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “अभिवादन करताना पादत्राणे बाजूला काढून ठेवणे ही भारताची संस्कृती आहे. महाराष्ट्राची तर आहेच आहे. सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती व महापुरुषांचा अनादर करणारे राज्यपाल हुतात्म्यांचाही अनादर करत असताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून दिली असती तर बरे झाले असते” असं सावंत यांनी म्हटलं आहे.