पुणे : मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि हिंदी सिनेविश्वात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनय कौशल्याने स्वत:ची स्वतंत्र ओळख प्रस्थापित करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. गेल्या 15 दिवसांहून अधिक काळापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखले यांच्या निधनाची माहिती रुग्णालय प्रशासनानं पत्रकार परिषद घेऊन दिली.
विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान त्यांच्या प्रकृतीत अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र, आज दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी विक्रम गोखले यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी वृषाली आणि कन्या असा परिवार आहे. आज संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
अनेक सुपरहिट चित्रपट दिले
विक्रम गोखले यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले होते. संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात तो ऐश्वर्याच्या वडिलांच्या भूमिकेत दिसला होते. याशिवाय ते ‘भूल भुलैया’, ‘दिल से’, ‘दे दना दान’, ‘हिचकी’, ‘निकम्मा’, ‘अग्निपथ’, ‘मिशन मंगल’ या हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले होते. भिंगरी, माहेरची साडी, लपंडाव, वासुदेव बळवंत फडके, सिद्धान्त हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.
‘बॅरिस्टर’ नाटकातून मिळाली ओळख
विक्रम गोखलेंनी सुद्धा आयुष्यात अनेक भूमिका केल्या पण त्यांची खरी ओळख आहे ती बॅरिस्टर. जयवंत दळवी लिखित हे नाटक मराठी नाटकांमधील एक दर्जेदार नाटक म्हणून मानलं जातं. मानवी नातेसंबंधांची अनोखी बाजू या नाटकाने मांडली. बॅरिस्टर या नाटकात विक्रम गोखले आणि त्यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी एकत्र काम केले होते. याशिवाय कथा, कमला, के दिल अभी भरा नही, छुपे रुस्तम, नकळत सारे घडले, दुसरा सामना, सरगम, स्वामी अशा अनेक नाटकात त्यांनी काम केले होते.