जळगाव: जिल्हा दूध संघाची निवडणूक आता प्रतिष्ठेसोबतच पैशांची देखील झाली असून, विधानपरिषदेप्रमाणे मनी पॉवर देखील गेम चेंजर ठरणार आहे. याआधी जिल्ह्यात 2009 च्या विधान परिषदेत निखील खडसे विरुध्द मनिष जैन यांच्यात झालेली लढत गाजली होती. तेव्हा माजी मंत्री सुरेशदादा जैन आणि आमदार एकनाथ खडसे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्याचप्रमाणे यंदाची दूध संघाची निवडणूक देखील गिरीश महाजन व एकनाथ खडसे यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदारांची दिवाळी होणार आहे. यामुळे शेकडोमध्ये होणारी निवडणुक आता लाखोमध्ये होणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.
भाजपच्या पॅनल मध्ये दिग्गज उमेदवार आहेत तर राष्ट्रवादीच्या माध्यमातून देखील जनाधार असलेले सहकारातील जाणकार दिग्गज उमेदवार आहे
त. केंद्र राज्यात सत्ता असणाऱ्या भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये दूध संघात आपल्या उमेदवारांना पराभूत न होऊ देता विजयी करणे स्वाभाविक असणार आहे. मात्र सलग सात वर्षे दूध संघात सत्ता उपभोगणाऱ्या खडसे यांनी देखील दूध संघावर आपल्याच पॅनलचा विजय होणार असा देखील दावा केला आहे.
भाजपची जादू चालणार?
सहकारात एकनाथ खडसे व त्याच्या पॅनल मधील उमेदवारांची मूठ सहकारात घट्ट असल्याचे सांगतात पण भाजपने सत्तेची जादू चालविल्यास काहीही होऊ शकते असा अंदाज बांधला जात आहे. अनेक माध्यमांमध्ये नेत्यांची विधानसभे पूर्वीची आमने-सामने लढाई असे हेडिंग देत बातम्या छापल्या आहेत, मात्र सहकारातील सेटलमेंट झाल्यास सर्वच प्रमुख दोन्ही पॅनल मधील प्रमुख नेते खुर्चीला खुर्ची लावून सोबत असतील हे देखील निश्चित आहे.
सेटलमेंटचे तंत्र ठरणार प्रभावी
राजकारणात देखील रॅकेट चालते ते सेटलमेंटचे, मात्र सहकारात हे उघड आहे. निवडणुका झाल्यावर कट्टर विरोधी असलेले नेते सेटलमेंटची भाषा करू शकतात. दूध संघाच्या निवडणुका आगामी जिल्ह्याच्या राजकारणाला एक वेगळे वळण लावणार हे अंदाजित राजकारणातून स्पष्ट होते. कोण नेता कोण अभिनेता हे दूध संघातील निकाल आल्यावर समजणारच आहे.