जळगाव: शिवसेना उध्दव बाळासाहेब पक्षाचे नेते तथा युवसेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. शरद कोळी यांनी मंत्री गुलाबराव पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. जिल्हाबंदी करून आवाज दाबण्याची दादागिरी सहन करणार नाही असं शरद कोळी म्हणाले. २०२४ ला निवडणूक लढून गुलाबराव पाटलांचं डिपॉझिट जप्त करणार असा इशारा शरद कोळींनी मंत्री गुलाबरावांना दिला.
ठाकरे गटाचे युवासेना नेते शरद कोळी यांनी केला. महाप्रबोधन यात्रेत जिल्हाबंदी असलेले शरद कोळी हे आज धरणगाव पोलीस ठाण्यात हजर झाले. कोळी हे आज धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी आले होते. यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी बोलताना 2024 ची निवडणूक ही मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात लढणार असल्याचा निर्धार केला. मंत्री गुलाबराव पाटील यांचे 30 ते 40 वर्षाचं राजकारण हे दादागिरीच्या जीवावर चालले आहे. मंत्रिपदाचा दुरुपयोग करत मंत्री गुलाबराव पाटील यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला, असा आरोप शरद कोळी यांनी केला. धरणगाव आणि जळगाव जिल्ह्यातील दादागिरी मोडून काढण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात दंड थोपटणार असून, जळगाव ग्रामीण मतदार संघातून आमदारकीची निवडणूक लढवणार असल्याचं शरद कोळी यांनी जाहीर केलं.
शरद कोळी नेमकं काय म्हणाले?
2024 मध्ये गुलाबरावांना ना भूतो ना भविष्य त्यांना मुळासकट उपटून काढणार. यांची दादागिरी मोडून काढण्यासाठी आम्ही शहीद झालो तरी चालेल, पण आम्ही आता थांबणार नाही. 30-40 वर्षापासून इथे दादागिरी चालू आहे. कोळी समाजाच्या जीवावर, शिवसेनेच्या जीवावर निवडून येऊन दादागिरी सुरु आहे. पण एकच सांगतो, तुम्ही मंत्रिमंडळाचा गैरवापर करुन, गोरगरिबांना त्रास देताय, ही दादागिरी मोडून काढणार. त्यासाठी 2024 मध्ये मी गुलाबरावांविरुद्ध निवडणुकीला उभं राहणार, त्यांचा पराभव करणार, असा निर्धार शरद कोळी यांनी बोलून दाखवला.