जामनेर (प्रतिनिधी): शहरात गेल्या काही दिवसांपासून नागरिक समस्यांनी त्रस्त झाले आहेत. मात्र नगरसेवक याकडे दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आता तर चक्क राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थान असलेल्या परिसरात काहींनी नगरसेवक हरवल्याचे पोस्टर लावले आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
मंत्री गिरिष महाजन यांच्या निवासस्थानाच्या परिसरात काहींंनी नगरसेवक हरवल्याचा फलक लावुन जामनेर नगर परिषदेच्या नगरसेवकांबाबत रहिवासी व नागरिकांमध्ये किती कमालीची उदासीनता आहे. हे लावलेल्या फलकावरून स्पष्ट होते. “आमचे नगरसेवक हरवले आहे. जनता त्रस्त, नगरसेवक मस्त’ असा स्पष्ट उल्लेख असलेला फलक काहींंनी राज्याचे मंत्री गिरिष महाजन यांच्या निवासस्थानच्या समोरच्या परिसरात म्हणजेच बजरंगपूरा भागात लावल्याने या विषयाने सर्वांचे लक्ष वेधले.
मंत्री महोदय लक्ष घालणार का?
एकंदरीत जामनेर नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता असुन एकही नगरसेवक विरोधक पक्षाचा नाही. साधना महाजन या नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा आहेत. मात्र संबंधित नगरसेवकांकडून आपापल्या वार्डात किंवा प्रभागात नागरिकांच्या प्रश्नांना सोडविण्यास असफल ठरत असल्याचे या फलकावरून दिसुन येते. तसेच मंत्री गिरिष महाजन यांच्याही लक्षात आणुन देण्यासाठी काही जागरूक नागरिकांंचा हा एक प्रयत्न तर नसावा.