चाळीसगाव : शहरातील शिवाजी चौकातील इलेक्ट्रिक दुकान फोडून चोरट्यांनी दोन लाख 30 हजार 500 रुपये किंमतीचे साहित्य लांबवणार्या बीड जिल्ह्यातील संशयीताला चाळीसगाव शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अकबर लूखमान खान (23, रा.टोला वडगाव, ता.आष्टी, जि.बीड) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
अजय पितांबर गेमनानी यांचे चाळीसगावातील गणेश रोडवरील शिवाजी चौकात धीरज इलेक्ट्रिक अॅन्ड इलेक्ट्रॉनिक दुकान असून रात्री 9 वाजता अजय गेमनानी हे दुकान बंद करून घरी गेले मात्र सकाळी 9 वाजता ते दुकान उघडण्यासाठी गेल्यानंतर त्यांना दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी खिडकीतील लोखंडी गज तोडून दुकानात प्रवेश करीत दोन हजार 400 रुपयांची रोकड, नऊ हजार 900 रुपये किंमतीचे एमसीबी, 25 हजार रुपये किंमतीचे टूल्स, दिड लाखांची फिटींग केबल असा एकूण दोन लाख 30 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज लांबवला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
चोरी नंतर व्यापारी अजय पितांबर गेमनानी (वय 37, शांती नगर, चाळीसगाव) यांनी चाळीसगाव शहर पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासचक्रे फिरवत संशयीत आहेत. अकबर लूखमान खान (वय 23, रा.टोला वडगाव, ता.आष्टी, जि.बीड) यास शनिवारी गोपनीय माहितीवरून अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीच्या अटकेमुळे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तपास सहा.निरीक्षक सचिन कापडणीस करीत आहेत.