भुसावळ : भुसावळ ते जळगावदरम्यान केवळ अप-डाऊन असे दोनच ट्रॅक असल्याने भुसावळ ते भादली सेक्शनदरम्यान २४ तासांत किमान १२ गाड्यांना आऊटर, भादली स्थानकावर थांबा द्यावा लागायचा. मात्र, या २४ किमी अंतरात तिसरी नवीन रेल्वे लाइन टाकल्याने रेल्वे मार्ग व्यग्रस्तेचे प्रमाण १४० टक्क्यांहून ११० पर्यंत खाली आले. परिणाम आता २४ तासांत १२ ऐवजी ५ गाड्यांना गरजेनुसार मध्येच थांबा द्यावा लागतो. चौथा मार्ग झाल्यावर हे प्रमाण पूर्णपणे कमी होऊन गाड्या नियोजित वेळेनुसार धावतील.
भुसावळ विभागात सन १९८९ नंतर म्हणजे तब्बल ३० वर्षांनंतर पहिल्यांदाच ७१ किमी अंतराच्या नवीन रेल्वे मार्गाची भर पडली. २०१९ ते २०२२ या कालावधीत भुसावळ ते पाचोरादरम्यान ही लांबी वाढली. यामुळे भुसावळ विभागातील एकूण रेल्वे मार्गाची लांबी ६४९.६१ किमीवरून ७२० किमी अंतराची झाली. यापूर्वी १९८९ मध्ये रेल्वे यार्डात नवीन लाइन टाकण्यात आली होती. दरम्यान, वाढलेल्या ७१ किमी पैकी २४ किमी अंतर भुसावळ ते जळगावदरम्यान आहे. त्याचा फायदा प्रवासी गाड्या व मालगाड्या वेळेत चालवण्यात होत आहे. कारण, यापूर्वी भुसावळ-जळगाव रेल्वे मार्ग १४० टक्के व्यग्र राहत असल्याने मालगाड्यांना पुढे काढण्यासाठी भुसावळ-भादली रेक्शनमध्ये २४ तासांत १२ गाड्यांना सक्तीचा थांबा द्यावा लागत होता.
जळगाव-पाचोरा तीन टप्प्यात काम
सुरक्षा आयुक्ताच्या आदेशानंतर जळगाव ते पाचोरा या मार्गावर तिसऱ्या रेल्वे लाइनचे काम पूर्णत्वास आहे. या मार्गाची चाचणी देखील घेण्यात आली. जळगाव ते शिरसोली ११.३५, शिरसोली ते माहेजी २१.५४ आणि माहेजी ते पाचोरा १४.७० किमी अशा तीन टप्प्यात हे काम झाले. मध्य रेल्वेने एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या काळात १५८ किमी अंतरात दुहेरीकरण करून विक्रम प्रस्थापित केला. या १५८ किमीत नरखेड-कळंभा, जळगाव-शिरसोली-माहेजी-पाचोरा (तिसरी लाइन), भिगवण-वाशिंबे, अंकाई किल्ला-मनमाड, राजेवाडी- जेजुरी-दौंड, काष्टी-बेलवंडी, वाल्हा-निरा, वर्धा-चितोडा (दुसरी कॉर्ड लाइन) या कामाचा समावेश आहे.