जळगाव (प्रतिनिधी) : ळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे. मात्र ही निवडणूक सर्वपक्षीय होऊन बिनविरोध करण्याचा प्रयत्न मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला होता. परंतु मुक्ताईनगरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी बिनविरोध निवडणूक करण्यास प्रखर विरोध दर्शवला आहे. त्यामुळे दुध संघ निवडणूकीत सर्वपक्षीय पॅनलसाठी सुरु असलेले प्रयत्न जवळपास संपुष्टात आले आहेत.
जळगाव जिल्ह्याचं राजकारण सध्या दूध संघाच्या निवडणुकीमुळे चांगलंच तापलं आहे. मागील सात वर्षापासून जळगाव जिल्हा दूध संघ हा एकनाथ खडसे समर्थकांच्या ताब्यात आहे. त्यांच्या ताब्यातून दूध संघ घेण्यासाठी भाजप आणि शिंदे गट एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजपचे आमदार मंगेश चव्हाण आणि शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील हे खडसेंच्या विरोधात मैदानात उतरलेत. खडसेंनी पुढाकार घेतला असता तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती असं गुलाबरावांनी म्हटलं होतं. त्यावर खडसे प्रतिक्रीया देताना म्हणाले, खडसे परिवार चालत असेल तर ही निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चेला तयारी दर्शवली होती. मात्र, आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसेंच्या विरोधात निवडणूक लढविण्याची ठाम भूमिका दर्शविली आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीची शक्यता संपुष्टात आली आहे.
मतदारांना घडविणार गुवाहाटी सहल
दुसरीकडे एका गटाने रात्रीतून मोठी तयारी केली असून रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यातून ५० लक्झरी बुक केल्या असून आज सायंकाळीच मतदारांना गुवाहाटीच्या सहलीवर रवाना केले जाणार असल्याचे कळते. थोडक्यात विधानपरिषदच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत साधारण २ ते ३ लाख फुली चालणार असल्याचे बोलले जात आहे. दुपारी तीन नंतर राजकीय हालचाली गतिमान होणार आहेत.