मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्याता आहे. संजय राऊत यांना बेळगाव न्यायालयाने समन्स पाठवलं आहे. बेळगावात सीमा प्रश्नावर प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव न्यायालयानं संजय राऊत यांना समन्स पाठवलं आहे. एक डिसेंबरला त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयात हजर न राहिल्यास संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
संजय राऊतांनी 30 मार्च 2018 मध्ये बेळगावात भाषण केलं होतं. त्याच भाषणात त्यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील 40 गावांवर दावा सांगितलाय. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांकडून कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्यात आला आहे. असं असताना राऊतांना कोर्टाचे समन्स आल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे.
न्यायालयात गेल्यावर होणार हल्ला-राऊत
याबाबत संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. माझ्या भाषणात प्रक्षोभक काय होत? तेच कळलं नाही. पण 2018 साली केलेल्या भाषणाची आता दखल घेऊन त्यांनी मला न्यायालयात हजर राहायला सांगितलं आहे. याचा अर्थ असा की, मी न्यायालयात गेल्यावर माझ्यावर हल्ला होईल, ही माझी माहिती आहे. बेळगाव न्यायालयात गेल्यावर मला अटक करावी आणि मला तिकडे बेळगावच्या तुरुंगात टाकावं, अशा प्रकारचं कारस्थान सुरू असल्याचं माझ्या कानावर आलंय, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे. कर्नाटक सरकारने कायद्याचे बडगे दाखवून तुरुंगात डांबलं तर त्याचे महाराष्ट्रात पडसाद उमटतील, असेही राऊत म्हणाले.
मी 70वा हुतात्मा व्हायला तयार
शिवसेनेने सीमा प्रश्नासाठी 69 हुतात्मे दिलेत. मी 70वा हुतात्मा व्हायला तयार आहे. बाळासाहेबांनी सीमा प्रश्नासाठी तीन महिन्याचा तुरुंगवास भोगला आहे. शिवसैनिकांनी तीन दिवस मुंबई पेटवली होती. मला अटकेची भीती नाही. महाराष्ट्रासाठी मला अटक करणार असतील तर मी नक्कीच जाईल. मी लपून छपून जाणार नाही. कोल्हापूरच्या रस्त्याने हजारो शिवसैनिक जाऊ आणि बेळगावच्या न्यायालयात स्वत:ला अटक करून घेऊ, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.