चोपडा : तालुक्यातील घोडगाव येथील रहिवासी असलेल्या दोन युवकांच्या दुचाकीला, अज्ञात वाहनाने धडक दिली. गलंगीजवळ २८ रोजी सायंकाळी ६ वाजता झालेल्या या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.
सुरेश कमलाकर बारेला (वय २५) आणि गोलू सदा बारेला (वय १७) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. सुरेश कमलाकर बारेला याच्याकडे स्वतःच्या मालकीचे ट्रॅक्टर असून तो शेतीच्या कामासाठी ते भाड्याने देत असे. गोलू सदा बारेला हा बारेला याच्याकडे कामाला होता. २८ रोजी गलंगी शिवारात ट्रॅक्टर भाड्याने दिले होते. सुरेश बारेला, त्याचा लहान भाऊ योगेश बारेला आणि गोलू बारेला हे गलंगी शिवारात ट्रॅक्टर घेऊन गेले होते. सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाला.
आज होणार शवविच्छेदन
त्यामुळे ट्रॅक्टरचे साहित्य घेण्यासाठी गलंगी येथे सुरेश व गोलू हे स्प्लेण्डर दुचाकीने (एम.एच.१९- ४९४०) जात होते. गलंगी जवळील पोलिस चौकीजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दोघांचे मृतदेह आणले. २९ रोजी शवविच्छेदन होणार आहे. माहिती मिळताच भूपेंद्र गुजराथी, डॉ.चंद्रकांत बारेला, गोपाल पाटील यांनी रुग्णालयात धाव घेतली.