मुंबई: गेल्या काही वर्षापासून रखडलेली पोलीस भरती अखेर आता होणार आहे. राज्यात 18 हजार जागांसाठी भरती होणार आहे. या संदर्भात अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू आहे. उमेदवारांना 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख होती, पण वेबसाईट सतत बंद होत असल्या कारणाने उमेदवारांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे अनेकांनी अर्ज भरण्याची मुदतवाढ देण्याची मागणी होत होती, या संदर्भात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
पोलीस भरतीसाठी 15 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे, या संदर्भात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली, तसेच दर मंत्रिमंडळ बैठकीत 75 हजार पद भरतीचा आढावा घेण्यात येणार असल्याचही फडणवीस म्हणाले. त्यामुळे आता ज्या उमेदवारांना पोलीस भरतीसाठी अर्ज भरताना अडचणी येत आहेत, त्यांना अर्ज भरता येणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत घेतला निर्णय
गेल्या काही दिवसापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे, पण वेबसाईट मध्येच हँग होत असल्या कारणामुळे अर्ज करण्यास अडचणी येत आहेत. यावर राज्यभरातून मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत होता. या मुद्द्यावर आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
कोणतं नॉन क्रिमिलीयअर ग्राह्य धरणार?
उमेदवारांना अर्ज भरताना नॉन क्रिमिलीयरच्या संदर्भातही काही तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. मागील वर्षाचं नॉन क्रिमिलीयर प्रमाणपत्र या वर्षी मिळतं. त्यामुळे मागील वर्षीचं हे प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार आहे. पोलीस भरतीसंदर्भातील ज्या काही मागण्या आहेत, त्या आम्ही मान्य केल्या आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.