मुंबई: राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार आहे. वंचित बहुजन आघाडीने शिवसेना ठाकरे गटासोबत युती करण्याची घोषणा केली आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
रेखा ठाकूर यांनी सांगितले की, वंचित बहुजन आघाडीचे राज्य कमिटीचे सदस्य महेंद रोकडे, मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन आणि वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांची शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि अन्य नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठका सकारात्मक झाल्या होत्या. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाला युतीसाठी होकार कळवला असल्याची माहिती त्यांनी दिली.
निवडणूक कशी लढणार?
शिवसेना नेते सुभाष देसाई हे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना येऊन भेटले. त्यांच्यातही दोन बैठका झाल्या असून युती संबंधी सकारात्मक चर्चा झाली आहे. वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्र विकास आघाडीत समाविष्ट करून चार पक्षीय आघाडीतून निवडणूक लढवणार की शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच निवडणूक लढवणार हे शिवसेनेने स्पष्ट करावे अशी मागणीदेखील वंचितकडून करण्यात आली आहे. या बाबतीतला निर्णय त्यांच्याकडून समजला की पुढच्या टप्प्याची चर्चा सुरु होईल असेही रेखा ठाकूर यांनी म्हटले.
दोन्ही नेत्यांकडून एकमेकांचं कौतुक
दरम्यान 20 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाच्या लोकार्पण कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं कौतुक केलं होतं. “प्रकाश आंबेडकर म्हणजे माहिती आणि ज्ञानाचा धबधबा’, ‘आमचं आणि त्यांचं वैचारीक एकच व्यासपीठ’, ‘प्रबोधनकार-आंबेडकरांचा विचार पुढे नेतोय” असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.