जळगाव : जळगाव जिल्ह्यात जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून चांगलाच राजकीय वातावरण तापला असतानाच आता या निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे. राज्यात सुरू असलेल्या सहकारी संस्थांच्या तसेच ग्रामपंचायत निवडणुका पाहता राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक कार्यक्रम २० डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्याने जळगाव जिल्हा दुध संघाच्या निवडणूक लांबणीवर पडली आहे. दरम्यान या निवडणुकीबाबत पुढील निर्णय २० डिसेंबरनंतर घेतला जाणार आहे.
जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात येत असताना निवडणुका लांबणीवर पडल्याने इच्छूकांचा हिरमोड झाला आहे. सोमवार, २८ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर मंगळवार, २९ नोव्हेंबर रोजी अंतीम उमेदवारी यादी व चिन्ह वाटप करण्यात आले मात्र हे सर्व सुरू असतानाच राज्यात होवून घातलेल्या सात हजार ७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असल्याने या कालावधीमध्ये मतदारांनी निवडणुकीत सहभाग जास्तीत जास्त नोंदविण्यात यावा यासाठी सहकारी संस्थांच्या निवडणुका २० डिसेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात येत असल्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत.
पुढील प्रक्रिया लांबणीवर
या आदेशानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये जळगाव जिल्हा दूध संघाचादेखील समावेश आहे. त्यामुळे मंगळवार, २९ नोव्हेंबर रोजी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या ४० उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. आता येथून पुढची मतदानाची प्रक्रिया ही २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश विशेष कार्य अधिकारी व सहनिबंधक सहकारी संस्थेचे श्रीकृष्ण वाडेकर यांनी काढले आहेत.