मुंबई : महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. आयुक्त, कुटुंबकल्याण संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदावरुन त्यांना पदमुक्त करण्यात आले आहे. मात्र, त्यांना नवीन पोस्टिंग देण्यात न आल्याने कुठे बदली होणार हे अजून स्पष्ट नाही.
शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं पुन्हा एकदा तुकाराम मुंढे यांना कार्यमुक्त होण्याचे आदेश दिले आहेत. कुटुंब कल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबईचा कार्यभार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांकडे तर, महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण सोसायटीचा कार्यभार देखील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांकडे सोपवून कार्यमुक्त होण्याचे आदेश काढले आहेत. कार्यमुक्त होऊन पुढील आदेशाची वाट पाहा, असं राज्य सरकारनं काढलेल्या आदेशात म्हटलं आहे.
तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे.
16 वर्षात 18 वेळा बदलीचा विक्रम
तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा विक्रम झाला आहे. आतापर्यंत 16 वर्षात तुकाराम मुंढेंच्या 18 वेळा बदली झाली आहे. दोन महिन्यापूर्वीच तुकाराम मुंढे यांची बदली झाली होती. स्पटेंबर 2022 मध्ये तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात होती. या दोन महिन्यात आरोग्य विभागात शिस्त आणण्याचा मुंढेंचा प्रयत्न होता. मुंढे यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जबाबदारी होती. दोन महिन्याच्या आत मुंडे यांचा कार्यभार काढला.
धडाकेबाज कार्यशैली कायम
आपल्या धडाकेबाज कामांसाठी प्रसिध्द असलेले तुकाराम मुंढे हे 2005 सालच्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. आतापर्यंत ज्या-ज्या ठिकाणी त्यांची पोस्टिंग झाली आहे त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाची छाप उमटवली आहे. ते ज्या ठिकाणी काम करायचे त्या ठिकाणच्या नागरिकांत त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत होतं. सामान्य लोकांना जरी तुकाराम मुंढेची कार्यशैली आवडत असली तरी सत्ताधारी आणि राजकारण्यांसाठी मात्र ती अडचणीची ठरत असल्याचं दिसत होतं. सत्ताधारी आणि विरोधकही तुकाराम मुंढेच्या विरोधात एकत्र यायचे. परिणामी तुकाराम मुंढेंची बदली व्हायची. असे असले तरी नव्या ठिकाणी रुजू झालेले तुकाराम मुंढेंनी आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमध्ये कोणताही बदल केला नाही हे विशेष.