पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचार आणि जाळपोळ प्रकरणाचा निषेध म्हणून जळगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या लोकनेते व कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. दाणा बाजार चौकात हे आंदोलन भाजपने केले असून, ममता बनर्जींविरोधात घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी निषेध जाहीर केला. ममता बॅनर्जी खुनी आहेत, दिदींची दादागिरी चालणार नाही, भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या ममता यांचा निषेध अशा आशयाचे फलक घेऊन भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.
जळगावचे भाजप चे आमदार राजुमामा भोळे यांची याविरोधात कडक शब्दात निषेध नोंदवला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार झाला आहे. हा हिंसाचार लोकशाहीची हत्या असून हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. याविरोधात देशभरातून तीव्र आंदोलने होत आहेत. सध्या देशभरात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व पक्ष येत असून देशात भाजपची सत्ता निर्माण होण्याच्या भीतीने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली असल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. हिंसाचाराच्या माध्यमातून नव्हे तर विकासाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे अन्यथा लोक माफ करणार नाहीत असे ते आंदोलनादरम्यान म्हणाले.