सावदा : गुरांची वाहतूक करणारे वाहन रोखल्याच्या रागातून सावदा शहरातील गो रक्षकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. या प्रकारानंतर जमाव संतप्त झाल्याने शहरात तणावाचे वातावरण पसरले. खबरदारी म्हणून जिल्ह्यावरून कुमक बोलावून शहरात शांतता प्रस्थापीत करण्यात आली. या प्रकरणी जमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नऊ संशयीतांना अटक करण्यात आली आहे तर शहरात तणावपूर्ण शांतता आहे.समजलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास गुरांची वाहतूक करणारे वाहन स्वामीनारायण नगर ते साळीबागनजीकच्या कत्तलखाना परीसरात सावदा भाजपचे शहराध्यक्ष जे.के.भारंबे यांच्यासह पाच ते सहा जणांनी पकडल्यानंतर संतप्त जमावाने वाद निर्माण करीत तलवारीसह लोखंडी रॉड व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात भारंबे यांच्यासह तिघे जखमी झाले. या प्रकाराची वार्ता शहरात पसरताच मोठ्या प्रमाणावर जमाव जमला. दरम्यान, जखमींना फैजपूर शहरातील डॉ. शैलेश खाचणे व सावदा येथील व्ही.जे.वारके यांच्या दवाखान्यात उपचारार्थ हलवण्यात आले आहे.
30 ते 4 संशयीतांविरोधात गुन्हा दाखल
जे.के.भारंबे यांच्या फिर्यादीनुसार सावदा पोलिसात संशयीत बिलाल कुरेशी, अशपाक कुरेशी, कादीर कुरेशी यांच्यासह 30 ते 4 संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सावदा शहरात फैजपूर, मुक्ताईनगर, यावल, रावेर, जळगाव, भुसावळ आदी ठिकाणाहून पोलिस कुमक मागवण्यात आली असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे.