चाळीसगाव : दोन्हीही मुलीच झाल्या म्हणून पत्नीचा निर्घ़ण खून केल्याची घटना चाळीसगाव शहरातील जय गणेश नगरमध्ये आज बुधवारी सकाळी घडली. दोन्ही मुलीच झाल्या म्हणून दारूड्या पतीने पत्नीच्या डोक्यात घाव घालून तिला संपवले. त्यानंतर त्याने रेल्वे पटरीवर जावून धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या भयंकर घटनेत दोन चिमुकल्या मात्र माता-पित्याच्या प्रेमाला मुकल्या आहेत. या प्रकरणी पत्नीचा खून करणाऱ्या मृत पतीच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील करगाव रोडवरील जय गणेश नगरमध्ये सुरज दिलीप कुऱ्हाडे (वय २८) हा पत्नी व दोन चिमुकल्या मुलींसह राहत होता. मातीकाम करून तो संसाराचा गाडा हाकत होता. सुरजचा जुनोने (ता. धुळे) येथील रेश्मा गायकवाड हिच्याशी तीन वर्षापूर्वी विवाहबध्द झाला होता. लग्नानंतर सुरजच्या दारूच्या व्यसनावरून पती पत्नीमध्ये भांडण होत असे. त्यांच्या संसारवेलीवर दोन्हीही मुलीच झाल्याने सुरज नाराज होता. चार महिन्यापूर्वी रेश्मा ही बाळंतपणासाठी जुनोने येथे गेली होती. २५ रोजी सुरज हा पत्नीला घेण्यासाठी जुनोने येथे गेला होता. तेथे दोन दिवसाच्या मुक्कामानंतर तो २८ रोजी पत्नी व दोन्ही मुलींना घेऊन चाळीसगावी परतला.
दुसऱ्या दिवशी खून
जुनोने येथून आल्यानंतर दोन दिवसच झाले होते. आज बुधवार दि.३० रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास सुरजने पत्नी रेश्मा हिच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून तिचा खून केला. सुरजच्या घराजवळ गर्दी जमली असतांना पोलीसांकडून माहिती मिळाली की, २५ ते ३० वर्ष वयाच्या इसमाने सुरजच्या घराजवळच असलेल्या धुळे रेल्वे पटरीवर रेल्वेखाली आत्महत्या केलेली आहे. रेश्माच्या नातेवाईकांनी तेथे जावून पाहीले असता सदर मयत इसम हा सुरज दिलीप कुऱ्हाडे हाच असल्याचे निष्पन्न झाले. रेल्वेखाली आत्महत्या केल्याने प्रताप शांताराम गायकवाड (रा.जुनोने ता,जि. धुळे) यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी हे करीत आहेत.