जळगाव: जळगाव महापालिकेच्या आयुक्त विद्या गायकवाड यांची झालेली बदली सध्या वादाच्या भवऱ्यात सापडलेली आहे. राजकीय वादामुळे ही बदली करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. नुकतेच नवनियुक्त आयुक्त देविदास पवार यांनी महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार घेतला असताना आयुक्त विद्या गायकवाड यांच्या बदलीवर प्रशासकीय स्तरावर स्थगिती मिळाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या सर्व घडामोडींमुळे जळगाव शहराच्या राजकारणात व प्रशासनात खळबळ माजली आहे.
महापालिकेच्या आयुक्त विद्या गायकवाड यांच्या बदलीच्या स्थगितीबाबत स्पष्टता येणार असल्याचे सांगितले जात आहे. आयुक्त विद्या गायकवाड यांची बदलीचे मुख्य कारण अमृत योजना 0.2 असल्याचे सांगितले जात आहे. अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या डिपीआर बनवण्यावरून विद्या गायकवाड व लोकप्रतिनिधींसोबत मतमतांतर निर्माण झाले होते. जळगाव शहराचे लोकप्रतिनिधी यांनी डीपीआर तयार करण्यासाठी निसर्ग या कंपनीला काम देण्यास विरोध दर्शवला होता.
मात्र यामध्ये भाजपमध्ये दोन गट उघडपणे पडल्याचे दिसून आले होते. डीपीआर तयार करण्याचा कालावधी कमी असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची संलग्न असलेल्या निसर्ग कंपनीला काम देण्यात आले होते.
देवाण-घेवाण केल्याचा आरोप
महापालिका स्तरावरच काम देण्यात भाजपमधील एका गटाने विरोध दर्शविला होता. भाजप मधल्या विरोध दर्शवणाऱ्या गटाने हे काम मजिप्रला देण्याचा चंग बांधला होता. निसर्गला परस्पर काम देण्यात आल्याने यामध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा देखील गंभीर आरोप करण्यात आला होता. यामध्ये प्रशासनातील अधिकाऱ्यांना तसेच सत्ताधाऱ्यांवर रोख होता.
वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार
निसर्गाला विरोध झाला म्हणून डीपीआर मध्ये त्रुटी असल्याचा कारण देत निसर्ग कडून काम काढून घेण्यात आले होते. मात्र आपल्या मर्जीप्रमाणे अमृत योजना 0.2 चे काम देण्याचे जिव्हारी लागल्याने भाजप मधल्या लोकप्रतिनिधींने आयुक्त विद्या गायकवाड ऐकून घेत नसल्याची तक्रार वरिष्ठ स्तरावर केली होती.
जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या मंत्र्यांची इच्छा नसताना मात्र आयुक्त विद्या गायकवाड यांची बदली करण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.