चाळीसगाव : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वेबसाईटवर अर्ज भरताना उमेदवारांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. अर्ज भरण्यासाठी केवळ एकच दिवसाची मुदत असून, अनेक इच्छुक उमेदवार वंचित राहण्याची शक्यता होती. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यास मुदतवाढीची मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी निवडणूक आयुक्त यांच्याकडे केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, आयोगाने वेळ वाढवून देत ऑफलाईन उमेदवारी अर्ज स्विकारण्यास मुभा दिली आहे.
राज्यभरातील जवळपास 7751 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यात चाळीसगाव तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. उद्या 2 डिसेंबर रोजी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर अर्ज भरताना मोठा तांत्रिक अडथळा येत आहे. तांत्रिक अडचणीमुळे अर्ज भरला न गेल्यास अनेक इच्छुक उमेदवार निवडणूक प्रक्रियेपासून वंचित राहण्याची शक्यता लक्षात घेता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी तसेच ऑनलाइन व ऑफलाईन असे दोन्ही प्रकारचे अर्ज स्विकारण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्याचे निवडणूक आयुक्त यांच्याकडे आज सकाळी केली होती.
इच्छुक उमेदवारांना दिलासा
याबाबत आमदार चव्हाण यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून पारंपरिक पद्धतीने म्हणजे ऑफलाईन उमेदवारी अर्ज स्विकारण्याची मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत वेळ देखील वाढविण्यात आली आहे. सद्यस्थितीत जळगाव, औरंगाबाद, जालना, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील ग्रामीण भागात उमेदवारांना या समस्येला सामोरं जावं लागत आहे. विविध ठिकाणी नेट कॅफेवर इच्छुकांची आणि कार्यकर्त्यांची गर्दी जमत आहे. अनेक महिला व जेष्ठ उमेदवारांना रात्रभर जागून आपला अर्ज भरावा लागत होता. ऑफलाईन अर्ज भरता येणार असल्याने हजारो उमेदवारांची यामुळे सोय झाली आहे.