मुंबई : परदेशात नोकरीचे आमिष दाखवून सर्वसामान्य बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा मुंबई सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी झांबिया, युगांडा, नामिबिया आणि घाना देशांतील चार जणांना अटक केली आहे. विदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणुकीची त्यांची योजना होती. मात्र, त्यापूर्वीच सायबर पोलिसांनी त्यांना जेरबंद केले आहे.
अमेरिका दूतावास कार्यालयात नोकरीला असल्याचे सांगून भारतीय तरुणांना परदेशात नोकरीचे स्वप्न दाखवून गंडा घातला जात होता. 5 एप्रिल ते 1 जुलै दरम्यान तक्रारदाराची डेव्हिड नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली. त्याने अमेरिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत एकूण 26 लाख 37 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधिताने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन पोलिसांनी तपास करून पुण्यातून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
तपासात धक्कादायक बाब उघड
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये ग्रीनवेल एमधलोवू, डोरकुस नकाबुका, सेसिलिया न्विनशेनी आणि तेसीन ऊर्फ कोफी ओंकोर डॉन यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आरोपींकडे 2 लाख ईमेल आयडी, 1 लाख 4 हजार मोबाइल क्रमांक सापडले आहेत. सायबर विभागाचे पोलीस उपआयुक्त डॉ. बालसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.