जळगाव : मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची बदली झाली होऊन त्यांच्या रिक्त जागेवर परभणीचे माजी आयुक्त देविदास पवार यांच्या नियुक्ती झाली होती. देवीदास पवार यांनी बुधवारी पदभारही स्वीकारला. मात्र, अतिशय नाट्यमयरित्या घडामोडी होऊन, नुतन आयुक्त पवार यांच्या नियुक्तीस स्थगिती मिळाल्याने आयुक्त विद्या गायकवाड यांची वापसी होणार आहे.
जळगाव महापालिकेच्या आयुक्त विद्या गायकवाड यांची झालेली बदली सध्या वादाच्या भवऱ्यात सापडलेली आहे. राजकीय वादामुळे ही बदली करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी देवीदास पवार यांची नियुक्ती झाल्याचे आदेश मंगळवारी (ता. २९) रात्री उशिरा काढण्यात आले होते. बुधवारी सकाळी अकराला श्री. पवार यांनी जळगावात दाखल होऊन पदभारही स्वीकारला. डॉ. विद्या गायकवाड पुणे येथे प्रशासकीय प्रशिक्षणासाठी गेल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या गैरहजेरीत श्री. पवार यांनी पदभार स्वीकारला. डॉ. विद्या गायकवाड यांना कोठेही पदनियुक्ती देण्यात आली नव्हती. आता पडद्याआड नाट्यमयरित्या घडामोडी होऊन अखेर नुतन आयुक्त देविदास पवार यांच्या नियुक्तीस स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे डॉ. विद्या गायकवाड या उद्या सकाळी पुन्हा आपला पदभार घेणार असल्याचे समजते.
धाडसी अधिकारी म्हणून ओळख
जळगाव शहरातील समस्या सोडविण्यासाठी धाडसी अधिकारी नियुक्त करावेत, असेही अनेकांचे मत होते. त्यामुळे शासनाने जळगाव शहराच्या डॉ. विद्या गायकवाड यांची आयुक्तपदी नियुक्ती केली होती. जळगाव महापालिकेच्या त्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. परभणी जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या श्रीमती विद्या गायकवाड यांचा जन्म एका सर्वसाधारण कुटुंबात झाला आहे. त्यांनी बीएचएमएस ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी घेतली आहे. राज्य सेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नांदेड महापालिकेच्या उपायुक्त म्हणून त्यांची पहिली नियुक्ती झाली. त्यानंतर परभणी महापालिका उपायुक्त, तर उदगीर व जळगाव जिल्ह्यातील अमळनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी म्हणून त्यांनी तीन वर्षे कार्य केले. जळगाव महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करताना त्यांना जळगाव शहरातील प्रश्न चांगले माहिती झाले. आयुक्तपदाची सूत्रे हाती घेल्यापासून त्यांनी थेट कामांचा धडकाच लावला आहे.