जळगाव: महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या बदलीबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. त्यांनी या विरोधात न्यायालयात धाव घेऊन बदलीच्या आदेशाला स्थगिती मिळवली आहे. महापालिकेत अधिकाऱ्यांवर दबाबतंत्र वापरले जातात. अनेक अधिकारी याला बळी पडले मात्र, आयुक्त विद्या गायकवाड यास अपवाद ठरल्या असून, या सर्व दबावतंत्राला झुगारुन त्यांनी काम केले आहे. त्यांनी थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असता, त्यांना न्याय मिळाला आहे.
जळगाव महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून श्रीमती विद्या गायकवाड यांनी कामांचा धडकाच लावला आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी वेळेचे बंधन न पाळण्याऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करीत त्यांना शिस्तीचे धडे दिले. त्यामुळे पालिकेच्या कामकाजात सुसूत्रता आली आहे. त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी नेहमी तत्पर राहिल्या आहेत.
कारभार यशस्वीपणे हाताळला
जळगाव महापालिका आयुक्तपद म्हणजे तारेवरची कसरत, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांत म्हटले जाते. आतापर्यंत नियुक्त झालेल्या आयुक्तांच्या कामकाजावरून ते दिसूनही येत आहे. कधी आयुक्त आणि सत्ताधाऱ्यांचे खटके उडाले, तर कधी दोघांची गाडी रूळावर असली, तरी शासनाकडून येणाऱ्या निधीचा प्रश्न निर्माण झाला. मात्र, आयुक्त विद्या गायकवाड यांनी मनपाचा कारभार यशस्वीपणे हाताळला आहे.
धाडसी अधिकारी म्हणून ओळख
जळगाव शहरातील समस्या सोडविण्यासाठी धाडसी अधिकारी नियुक्त करावेत, असेही अनेकांचे मत होते. त्यामुळे शासनाने जळगाव शहराच्या डॉ. विद्या गायकवाड यांची आयुक्तपदी नियुक्ती केली होती. जळगाव महापालिकेच्या त्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. परभणी जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या श्रीमती विद्या गायकवाड यांचा जन्म एका सर्वसाधारण कुटुंबात झाला आहे. त्यांनी बीएचएमएस ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी घेतली आहे. राज्य सेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नांदेड महापालिकेच्या उपायुक्त म्हणून त्यांची पहिली नियुक्ती झाली. त्यानंतर परभणी महापालिका उपायुक्त, तर उदगीर व जळगाव जिल्ह्यातील अमळनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी म्हणून त्यांनी तीन वर्षे कार्य केले. जळगाव महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करताना त्यांना जळगाव शहरातील प्रश्न चांगले माहिती झाले. आयुक्तपदाची सूत्रे हाती घेल्यापासून त्यांनी थेट कामांचा धडकाच लावला आहे.
डीपीआर बनवण्यावरुन दबाब
आयुक्त विद्या गायकवाड यांची बदलीचे मुख्य कारण अमृत योजना 0.2 असल्याचे सांगितले जात आहे. अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या डिपीआर बनवण्यावरून विद्या गायकवाड व लोकप्रतिनिधींसोबत मतमतांतर निर्माण झाले होते. जळगाव शहराचे लोकप्रतिनिधी यांनी डीपीआर तयार करण्यासाठी निसर्ग या कंपनीला काम देण्यास विरोध दर्शवला होता. मात्र यामध्ये भाजपमध्ये दोन गट उघडपणे पडल्याचे दिसून आले होते. डीपीआर तयार करण्याचा कालावधी कमी असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची संलग्न असलेल्या निसर्ग कंपनीला काम देण्यात आले होते.