जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. दोन दिवसापुर्वी दूध संघाच्या निवडणुकीला अचानक काही दिवसांसाठी स्थगिती देण्यात आली होती. मात्र, आज राज्य सरकारने पुन्हा नवीन अध्यादेश काढला आहे. त्यानुसार दूध संघाची स्थगित झालेली निवडणूक प्रक्रिया वेळेवरच होणार होणार आहे.
जळगाव जिल्हा दूध संघाची १० डिसेंबर रोजी होणारी निवडणूक २० डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली होती. राज्यात ग्रामपंचायत निवडणुका होऊ घातल्या आहे. ग्रामपंचायत आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे कार्यक्षेत्र ग्रामीण भाग असल्याने अनेक मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता लक्षात घेता, दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकांची प्रक्रिया शासनाने स्थगित केली होती. तसेच नवीन प्रक्रिया २० डिसेंबर नंतर सुरु होणार होती.
आमदार मंगेश चव्हाण यांचा पाठपुरावा
भाजप आमदार मंगेश चव्हाण हे निवडणूक वेळेवर व्हावी, यासाठी प्रयत्नशील होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत निवडणूक वेळेवर घेण्याची विनंती केली होती. आज याबाबतचे आदेश नुकतेच समोर आले आहेत. या आदेशात २९ नोव्हेंबर रोजी ज्या टप्प्यावर निवडणूक थांबवण्यात आली होती, तेथूनच पुढे सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्राचे कार्यकारी अधिकारी अनिल जे. चौधरी यांच्या सहीचे हा आदेश आहे. त्यामुळे शासनाच्या नव्या आदेशानुसार १० डिसेंबर रोजीच मतदान होणार आहे.