मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | महाराष्ट्रात सध्या स्वबळावरून राजकीय परिस्थिती चिघळलेली दिसत आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी विधानसभा निवडणुका व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढणार असे वक्तव्य केल्या नंतर आघाडी सरकारच्या एकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कडक शब्दात ठणकावत इशारा दिला आहे. जर शेवटपर्यंत कॉंग्रेसने स्वबळाचा आग्रह धरला तर शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणूक लढवेल असे जयंत पाटील म्हणाले.
“ आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. त्यांचे अध्यक्ष स्वबळाबद्दल बोलत असतील, तरी जेव्हा परिस्थिती येईल, तेव्हा आम्ही सगळे एकत्र लढू असे मला वाटते. जर, कॉंग्रेसने शेवटपर्यंत स्वबळाचाच आग्रह धरला तर शिवसेना व राष्ट्रवादी एकत्रित पणे निवडणुकांना सामोरे जातील” असे जयंत पाटील म्हणाले. दरम्यान जयंत पाटलांनी तीनही पक्ष एकत्रित निवडणूक लढवतील असा आशावादही व्यक्त केला आहे.