नवी दिल्ली : भारतीय रेल्वेशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीहून येणाऱ्या निलांचल एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या सुलतानपूर येथील एका प्रवाशाच्या गळ्यात लोखंडी रॉड आरपार घुसल्याने त्याचा मृत्यू झाला. सोमना आणि डांबर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. अपघातानंतर ट्रेनमध्ये घबराट पसरली होती. प्रवाशाचा मृतदेह रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आला. रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे प्रवासी जिवाला मुकल्याचा आरोप होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरिकेश दुबे नामक तरुण विंडो सीटवर बसला होता. या भागात रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. अचानक एक लोखंडी पहार उडाली आणि काच फोडून थेट हरिकेश यांच्या गळ्यात जाऊन घुसली. त्यात या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना घडली तेव्हा रेल्वेचा वेग ताशी 110 किमीच्या आसपास होता. ही घटना डाबर-सोमना रेल्वे स्थानकाजवळ घडली. लोखंडी गज हरिकेश यांच्या गळ्यात शिरताच रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. हे पाहून त्यांच्या शेजारी बसलेल्या प्रवाशांनी एकच आरडाओरडा केला. रेल्वे अलीगड रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर प्रवाशाचा मृतदेह जीआरपीला सुपूर्द करण्यात आला.
शेजारील महिला थोडक्यात बचावली
या भयावह दुर्घटनेत हरिकेश यांच्याजवळ बसलेली एक महिला थोडक्यात बचावली. महिला आपल्या सीटवर बसली होती. पहार तिच्या मानेजवळून गेली. त्या महिलेने रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितले – रेल्वे खूप वेगात होती. यावेळेस अचानक एक लोखंडी पहार शेजारील तरुणाच्या मानेत घुसला. यामुळे सीटवर सर्वत्र रक्ताच्या चिरकांड्या उडल्याचे सांगितले. ही पहार रेल्वे रुळांवर पडली होती. रेल्वेचे चाक त्यावरून गेल्याने ती उसळली व खिडकी फोडून थेट हरिकेशच्या मानेत घुसली. ही पहार हरिकेशच्या मागच्या सीटपर्यंत पोहोचली होती, एवढा हा अपघात भीषण होता.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
उत्तर रेल्वेचे CPRO हिमांशु शेखर उपाध्याय यांनी सांगितले की, जीआरपी व आरपीएफने या घटनेची संयुक्त चौकशी सुरू केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यासह या प्रकरणी कायदेशीर कारवाईही केली जात आहे. लोहमार्ग पोलीस निरीक्षक सुबोध यादव यांनी सांगितले की, या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात कलम 304 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुळावर काम करणाऱ्या मजुरांचाही शोध घेतला जात आहे.