जळगाव: तालुक्यातील गिरणा नदीपात्रात अनधिकृत वाळू उपसा करुन वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर तहसीलदार नामदेव पाटील यांच्या पथकाने जप्त केले आहे. वाळू उपस्याबाबत राजमुद्रा न्यूजने वाचा फोडली होती. त्यामुळे याची दखल घेत प्रशासनाने ॲक्शन मोडवर येऊन कारवाई सुरु केली आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
गिरणा नदीपात्रात वाळूमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. नदीपात्रात दिवसभर मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असतो. त्यामुळे ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, नदीपात्र विद्रूप झाले आहे. खड्ड्यामधील कपारीचा अंदाज न आल्यामुळे अनेकांनी जीवही गमावल्याच्या घटना घडल्या आहे. तरीदेखील हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. याबाबत राजमुद्रा न्यूजने वारंवार वृत्त प्रकाशित करुन या प्रकाराकडे लक्ष्य वेधले आहे.
तहसील प्रशासनाकडून कारवाई
गुरुवारी दुपारी १२ वाजता आव्हाणे रस्त्यावरुन एक तर दुसरे ट्रॅक्टर सावखेडा येथील नदी पात्रात पकडले असून, दोन्ही ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जमा केले आहे. राजमुद्रा न्यूज ने गेल्या काही दिवसांपासून गिरणा नदीपात्रातील अनधिकृत वाळू उपस्याचा प्रश्न मांडला असून, या वृत्ताची दखल घेत आता तहसील प्रशासनाने कारवाई सुरु केली आहे. गेल्या तीन दिवसात पाच ट्रॅक्टर जमा केले आहेत. तसेच निमखेडीकडून नदीपात्रात जाणारे रस्तेही खोदून बंद करण्यात आले आहेत.