भुसावळ : महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या योजनेत कोट्यवधींच्या अपहार प्रकरणी जळगाव आर्थिक गुन्हे शाखेने भुसावळातील विनोद निकम या संशयीतास अटक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे डीवायएसपी डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून अर्थसहाय्य घेताना बोगस लाभार्थी दाखवून महामंडळ व बँकेच्या अधिकार्यांनी साडेतीन कोटी रुपयांचा अपहार केला होता. शेकडो बोगस लाभार्थी दाखविण्यात आले होते. यात महामंडळ व बँकांचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह एजंट आदींचा समावेश होता. २०१६ ते २०१८ या कालावधीत हा अपहार झाला होता. याप्रकरणी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अधिकार्याने तक्रार दिल्यानंतर रामानंद आणि जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. यात बँकेच्या अधिकारी, कर्मचार्यांनी दलालांना हाताशी धरुन एकाचा फोटो दुसर्याच्या आधार कार्डवर, पत्ता तिसर्याचाच अशा प्रकारची शेकडो बोगस प्रकरणे तयार करून बीज भांडवल योजनेंतर्गत कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे.