जळगाव : जिल्ह्याच्या राजकारणात सुरेशदादा जैन यांचा मोठा दबदबा राहिला आहे, गेली ३५ वर्ष सुरेश दादा जैन यांची एक हाती सत्ता जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात राहिली. सतत ठेवलेल्या प्रभावामुळे अनेक राजकीय पक्ष बदलून देखील सतत सत्तेच्या प्रवाहात राहिले. अनेक राजकीय भूकंप घडवून आणण्यात त्यांची भूमिका महत्वाची ठरली आहे.
मात्र, घरकुल घोटाळ्यात झालेल्या कायदेशीर अडचणीमुळे त्यांच्या राजकीय करिअरला ब्रेक लागला हे सर्वश्रुत आहे, त्यांना अटक करण्यासाठी काही वरिष्ठ नेत्यांनी राजकीय फिल्डींग लावल्याची आज देखील चर्चा होते. घरकुल घोटाळ्यात सुरेश दादा जैन यांना शिक्षा ठोठवण्यात आली आहे. याप्रकरणी वैद्यकीय कारणावर त्यांचा जाचक अटी देऊन जामीन न्यायालयाने दिला होता. त्यांना मुंबईच्या बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा न्यायालयाकडून नियमित जामीन देण्यात आला आहे. यामुळे ते पून्हा राजकारणात सक्रिय होतील का? अशी जोरदार चर्चा जळगाव राजकीय मैदानात सुरु आहे.
शिंदे गट किंवा भाजपची वाट निवडणार?
नियमित जामीन झाला, मात्र ते सध्या तरी ठाकरे गटाच्या शिवसेनेत आहे. शिवसेनेच्या फुटीमुळे सध्याचे राजकारण ठाकरे-शिंदे व भाजपच्या अवती-भोवती फिरताना दिसून येत आहे. थेट मातोश्रीपर्यत संपर्क असलेले सुरेश दादा राजकारणात सक्रिय होतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे, कि शिंदे गट अथवा भाजपचा पर्याय अवलंबनार हा एक चर्चेचा मुद्दा बनला आहे.
शिंदे गटाला होणार फायदा?
नेहमी सत्तेच्या जवळ सुरेश दादा जैन राहिलेले आहे, एके काळाचे साथीदार असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील त्यांचा थेट संबंध आहे. यातच सुरेश दादा जैन यांचे निकटवर्तीय असलेले गुलाबराव पाटील हे देखील शिंदे गटात मंत्री झालेले आहे, शिंदे गटाला सध्या राजकारणात मातब्बर व कसलेल्या नेत्यांची गरज आहे. यामुळे गुलाबराव पाटील शिंदे गटाच्या शिवसेनेत सहभागी होण्याचे आमंत्रण देऊ शकतात. आगामी काळातील निवडणुकांसाठी शिंदे गटाला राजकीय आखणी करण्यासाठी सुरेश जैन उत्तम पर्याय ठरू शकतात.
भाजप नेत्यांशी संपर्क ?
जळगाव जिल्ह्याला मातब्बर नेत्यांचा वारसा राहिला आहे, लोकनेते प्रतिभा ताई पाटील, मुरलीधर अण्णा पवार, लोकनेते मधुकरराव चौधरी यांच्या सह अनेक नेते राजकारणात यशस्वी झाले यामध्ये सर्वाधिक काळ सत्तेच्या तसेच महाराष्ट्रात स्वतःचा राजकीय प्रभावामुळे सुरेश दादा जैन नामांकित झाल्याचे पाहायला मिळाले, जळगाव जिल्ह्यात सध्या भाजपमध्ये मंत्री गिरीश महाजन यांचा एकसूत्री कारभार आहे, त्यांनी अनेक वेळा सुरेश दादा जैन आमचे नेते असल्याचे अनेक वेळा बोलून दाखविले आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपला सोडचिट्टी देत राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधले आहे, जिल्ह्यात भाजपला संपूर्ण जिल्ह्या ताब्यात घ्यायचा असेल तर गिरीष महाजनांना मोठी मदत सुरेश दादा जैन यांच्या माध्यमातून मिळू शकते मातब्बर नेते असताना त्यांचा राजकीय अनुभव भाजपला फायदेशीर ठरू शकतो.
गिरीश महाजनांची झाली मदत
घरकुल घोटाळ्यात सुरेश दादा जैन व त्यांच्या समवेत असलेले सहभागी नगरसेवक यांना न्यायालयीन लढाईच्या कामकाजात मंत्री गिरीश महाजन यांची मोठी मदत झाली, सुरेश दादा जैन कारागृहात असताना अनेकवेळा गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेतली होती. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सुरेशदादा जैन यांना मंत्री महाजनांना कडून संकटकाळी मदत झाल्याचे बोलले जाते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत असलेले मैत्री पूर्ण संबंध यामुळे भाजप मधून देखील त्यांना राजकारणात सक्रिय होण्यासाठी ऑफर येऊ शकते.
कार्यकर्त्यांना लागली राजाश्रयाची आस
सुरेश दादा कोणत्या पक्षात जातात हा विषय जरी गौण असला तरी ते पुन्हा राजकारणात सक्रिय होतील का ? हा प्रश्न महत्वाचा आहे कारण राजा परत येतोय अशा पोष्ट सध्या त्याच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर फिरवल्या जात आहे. सुरेश दादा राजकारणात पुन्हा सक्रिय झाल्यास आपल्याला देखील राजाश्रय मिळेल राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याची संधी मिळू शकते असा कयास सुरेश दादा समर्थकांकडून बांधला जात आहे.