नागपूर : शैक्षणिक नुकसान झाल्यामुळे पॉलिटेक्निक करणाऱ्या विद्यार्थ्याने कॉलेजच्या बिल्डींगवरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिंगणा मार्गावरील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरींग कॉलेजमध्ये घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, योगेश विजयकुमार चौधरी (वय 20, श्रीरामनगर भुसावळ, जि. जळगाव) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो जी. एच. रायसोनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये पॉलिटेक्निक सीओ शाखेत प्रथम वर्गात शिक्षण घेत होता. योगेशने 11 वी व 12 वी कॉमर्स केल्यानंतर 2 वर्ष लॉच्या अॅडमिशनसाठी तयारी केली. यात त्याचे दोन वर्ष गेल्यानंतरही त्याला यश मिळाले नाही. त्याच्या सोबतचे दहावीतील सगळे मित्र लॉ आणि इंजिनिअरींगला गेले.
नैराश्यातून केली आत्महत्या
या सगळ्या घडामोडीत चार वर्ष गेल्यानंतर योगेशने पॉलिटेक्निकला प्रवेश घेतला. तेथे त्याचे सोबत शिकणारे सर्वजण 16 वर्षाचे आणि योगेश 20 वर्षांचा होता. आपले चार वर्ष वाया गेल्यामुळे त्याला सतत वाईट वाटायचे. याच नैराश्यातून त्याने कॉलेजच्या बिल्डींगवरून उडी घेऊन आत्महत्या केली. त्याचा रुम पार्टनर सार्थक जितेंद्र अग्रवाल (वय 16, रनाळा कामठी) याने दिलेल्या सुचनेवरून एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मित्राजवळ व्यक्त केला होता आत्महत्येचा विचार
चार दिवसांपूर्वी योगेशने आपला रुम पार्टनर सार्थकजवळ आत्महत्येचा विचार बोलून दाखविला होता. आपले चार वर्ष वाया गेल्यामुळे मला कॉलेजच्या बिल्डींगवरून उडी घेऊन आत्महत्या करावी वाटते असे त्याने बोलून दाखविले होते. परंतु त्याचे बोलणे सहज वाटल्यामुळे रुम पार्टनरने ते फारसे गंभीरपणे घेतले नाही. योगेशच्या कुटुंबात आई-वडिल आणि एक बहिण आहे. बहिणीचे लग्न झाले आहे. योगेशच्या आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.