मुंबई : एखादे जुने घर किंवा दुकान खरेदी केल्यानंतर त्याचे विजेचे कनेक्शन जुन्या मालकाकडून नव्या मालकाच्या नावावर होण्यासाठीची ग्राहकांची धावपळ आता बंद होणार आहे. महावितरणने मुद्रांक नोंदणी विभागाशी समन्वय साधत ऑनलाइन यंत्रणा विकसित करून घेतली आहे, त्यामुळे जुने कनेक्शन आपोआप नावात बदल होत नव्या मालकांच्या नावावर होणार आहे. महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून ही नवी व्यवस्था विकसित केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘ईज ऑफ लिव्हिंग’च्या सूचनेनुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. एखाद्याने जुने घर किंवा दुकान खरेदी केले आणि त्यानुसार मुद्रांक शुल्क भरून संबंधित विभागाकडे नोंदणी केली की त्यानंतर त्या घराचे किंवा दुकानाचे विजेचे कनेक्शन जुन्या मालकाकडून आपल्या नावावर होण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत होता.
कागदपत्र पडताळणीसाठी वेळेचा अपव्यय
या बदलासाठी महावितरणकडे अर्ज व सोबत कागदपत्रे दाखल करून प्रक्रिया शुल्क भरल्यानंतर कंपनीच्या कर्मचार्यांकडून पडताळणी केली जात असे. महावितरणने यासाठी ऑनलाईन सुविधाही उपलब्ध केली आहे. त्यानुसार ऑनलाईन अर्ज भरून संबंधित कागदपत्रे अपलोड करता येतात. परंतु, या प्रक्रियेत कागदपत्रांच्या पडताळणीत वेळ जात होता. ग्राहकांना अनेकदा पाठपुरावा करावा लागत होता.
अशी नवीन यंत्रणा
नव्या व्यवस्थेनुसार मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाशी महावितरणची आयटी सिस्टिम जोडली आहे. नोंदणी विभागात नव्या मालकाच्या नावाची प्रक्रिया पूर्ण झाली की, महावितरणला संदेश पाठविला जातो, त्यानुसार महावितरणकडून संबंधित ग्राहकाला एसएमएस पाठविला जातो व आवश्यक प्रक्रिया शुल्क भरण्यास कळविले जाते. हे शुल्क ग्राहक घरात बसून ऑनलाईनही भरू शकतो.