रावेर : तालुक्यातील सावदा येथील भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणातील १३ आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे यांना कत्तलखान्याजवळ काही मुलांना जमाव मारहाण करत असल्याची माहिती मिळाली. यामुळे ते आपल्या दुचाकीवरून तेथे नेमका काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी गेले. याप्रसंगी बिलाल कुरेशी, अशफाक कुरेशी व कादीर कुरेशी यांच्यासह सुमारे ४० जणांच्या जमावाने प्राणघातक हल्ला चढविला होता.
तलवारीने हल्ला चढविला
यात जमावाने जितेंद्र भारंबे यांच्यासह इतरांवर लाठ्या-काठ्या आणि तलवारीने हल्ला चढविला. यात त्यांना पिस्तुल दाखवून धमकावण्यात आले. तसेच पिस्तुलीच्या दस्त्याने त्यांना मारहाण झाली. या हल्ल्यात जितेंद्र भारंबे यांच्यासह गणेश देवकर, पंकज चौधरी, पवन महाजन व राहूल पाटील हे जखमी झाले असून तर जितेंद्र भारंबे हे गंभीर जखमी झाले होते.
१३ आरोपींना अटक
या प्रकरणी जमावाच्या विरोधात सावदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात प्रारंभी तीन जणांना अटक करण्यात आली होती. यानंतर आता १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये शेख बिलाल शेख अयुब कुरेशी, शेख कादीर शेख अयुब कुरेशी, शेख साबीर उर्फ बुढा शेख लाल, शेख इकबाल शेख गफ्फार, शेख आबीद शेख लतीफ, रमजानखान उर्फ तासीफखान महेबुबखान, शेख शाहबाज शेख जमील, शेख मुक्तार शेख अरमान, शेख कलीम शेख अयुब, अशफाकखान उर्फ अबु असलमखान, मोईन उर्फ मोयालाला शेख हसन, शेख साबीर उर्फ अल्लारखा शेख खलील, मुजम्मीलखान अजगरखान यांचा समावेश आहे. तर अजून २० जण फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.