जळगाव: कोणालाही छत्रपती यांच्या विषयी बोलण्याचा अधिकार नाही, कोणही उठते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलत आहे. आता इथून पुढे कुणी शिवरायांचा अवमान केला तर मी सोडणार नाही. मंत्रिपद गेले खड्ड्यात, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.
भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही कोकण महोत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात अजब वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. यावरुन आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. यावर शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी सूचक इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचा कुण्या मायच्या लालला अधिकार नाही. शिवरायांबद्दल कोणीही वाकड तिकडं बोलत असेल तर तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला माफ केलं जाणार नाही. शिवरायांच्या नखाची बरोबरी हे नालायक करू शकत नाहीत. पुन्हा जर अवमान केला तर मंत्रीपद गेल खड्ड्यात यांना सोडणार नाही, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.
संजय राऊतांना लगावला टोला
चार महिने झाले विरोधकांकडून सतत टीका सुरू आहे. आमच्या विकास कामांची जी गती आहे ती जनतेला आवडत आहे. आता मुख्यमंत्र्यांवर जे पैशांच्या उलाढालीचे गंभीर आरोप केले जात आहेत, त्याने जनतेचे पोट भरत नाही. मागच्या दरवाजांनी निवडून आलेल्या संजय राऊत यांना पुढच्या दरवाजाने कसे निवडून यायचं हे माहीत नसल्याने ते अशा पद्धतीने गंभीर आरोप करत आहेत, असा टोला गुलाबराव पाटील यांनी राऊत यांना लगावला.
आदित्य ठाकरेंवर टीका
युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी इमान विकलेल्या लोकांचे सरकार लवकरच पडेल अशी टीका केली आहे. त्यालाही पाटील यांनी जोरदार उत्तर दिले. ते वारंवार सरकार पडणार असल्याचं सांगत आहे. मीही किती दिवसांपासून तीच वाट पाहत आहे. सरकार म्हणजे काय डोंबाऱ्याचा खेळ आहे का? पोरगी वर दोरीवर चालतेय आणि खाली डोंबारी वाजवतोय. वाजू द्या. त्यांना काय वाजवायचं ते वाजू द्या, अशी टीका त्यांनी आदित्य ठाकरेंवर केली.
आमदार प्रसाद लाड काय म्हणाले?
मुंबईतील कोकण महोत्सावात बोलताना आमदार प्रसाद लाड यांनी हे विधान केले. ‘स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी हे तुम्ही विचाराल, हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा कोकणात झाला. यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले, त्यांची सुरूवात कोकणात झाली, असं आमदार प्रसाद लाड बोलत असल्याचे दिसत आहे. या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.