जळगाव: जिल्ह्यात होणाऱ्या बेसुमार वाळू वाहतुकीचा गेल्या अनेक दिवसापासून पर्दाफाश करण्याचा प्रयत्न राजमुद्राच्या माध्यमातून सुरू आहे. आव्हाने, आव्हाणी, फुफनगरी, खेडी, बांभोरी, वननगरी, निमखेडी, सावखेडा यांच्यासह गिरणा नदीपत्रात बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. या भागातील तहसीलदार असलेले नामदेव पाटील हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. मात्र त्यांना देखील वाळू उपसा रोखण्यात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे.
गिरणा नदी परिसरात रात्री हजारो ब्रास वाळूची वाहने जळगावच्या दिशेने येत आहे. काही वाहने भुसावळपर्यत वाळू वाहतूक करीत आहे. उघडपणे वाहतूक सुरू असताना यंत्रणेतील काही अधिकारी देखील यामध्ये सहभागी असल्याची चर्चा आहे. वाळू व्यवसायात कोणते अधिकारी अर्थपूर्ण सहभाग नोंदवत आहे? हा चौकशीचा भाग असला तरी आजतागायत अवैध वाळू वाहतूक रोखण्यात महसूल यंत्रणा सपशेल अपयशी ठरत आहे.
गिरणा नदीपात्रामध्ये जत्रेचे स्वरूप
उपजिल्हाधिकारी असलेले प्रवीण महाजन यांनी अनेक वेळा रोख लागावा असा पुढाकार घेतला. मात्र त्यांनी नेमक्या कोणत्या उपाययोजना वापरल्या हा समजून घेण्याचा विषय आहे. रोज रात्री गिरणा नदीपात्रामध्ये जत्रेचे स्वरूप येत आहे. अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी पथके नियुक्ती केल्यावर देखील पथके नेमके कुठे आहेत? हा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.