नवी दिल्ली: ओपेक प्लस (OPEC+) देशांनी सध्याच्या कच्च्या तेलाच्या उत्पादनात कोणत्याही पद्धतीचा बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमध्ये कच्च्या तेलाची घटती मागणी पाहता ओपेक प्लस देश कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट करण्याची शक्यता वर्तवली जात होती.
२३ देशांच्या संघटनेनं ऑक्टोबर महिन्यात दैनंदिन पातळीवर दोन मिलियन बॅरल इतकी मोठी घट करण्याचा निर्णय घेतला होता. ही घट यापुढेही कायम राहणार आहे. पण यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत नेमका किती फरक पडेल याची स्पष्टता अद्याप आलेली नाही. चीन सरकारच्या झीरो कोविड पॉलीसीमुळे देशातील उद्योग प्रभावित झाले आहेत. ज्यामुळे देशाताली कच्च्या तेलाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यामुळे जागतिक पातळीवरही कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. चीन जगातील सर्वात मोठा तेल आयात करणारा देश आहे.
कच्च्या तेलाच्या दरात मोठी घट
ओपेक प्लस देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट केल्याच्या निर्णयाचं मुख्य कारण आर्थिक स्थित असल्याचं मानलं जात आहे. चीनमधील कच्च्या तेलाच्या मागणीची घट, सुस्त जागतिक विकास दर आणि उच्च व्याजदरांमुळे ऑक्टोबरमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीतही घट झाली. ऑक्टोबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव गेल्या १० महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर पोहोचला होता.
भारतात काय होणार परिणाम
आंतरराष्ट्रीय बाजारात बऱ्याच कालावधीपासून कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. यातच इंडियन ऑइल, बीपीसीएल-एचपीसीएल सारख्या तेल मार्केटिंग कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एसएमसी ग्लोबलच्या माहितीनुसार कच्च्या तेलाच्या दरात एक डॉलरची घसरण झाली की भारतीय तेल कंपन्यांच्या रिफायनिंगवर ४५ पैसे प्रतिलीटर इतकी बचत होते.