जळगाव: जिल्ह्यात वाळू माफियांकडून सुरु असलेला नंगानाच नवीन नाही , मात्र आता जिल्ह्यात वाळू माफियांच्या बोगसगिरीने साऱ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. गिरणा नदी पात्रातून वाळू उचलायची आणि त्याला गुजरातची पावती दाखवून ती जिल्ह्यात बिंधास्तपणे विकायची असा उद्योग पोलीस आणि महसूलच्या आशिर्वादाने सध्या जोरात सुरु आहे.
जिल्ह्यात वाळूवर मोठ्या प्रमाणावर अर्थकारण चालत आलेले आहे. वाळू माफियांनी पोलीस आणि महसूलच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सर्रास गिरणा पात्राची चाळणी केली असून, वाळूचे भाव देखील मोठ्या प्रमाणावर वाढविले आहेत. जिल्ह्यात वाळू वाहतुकीला आणि उपशाला बंदी होती, त्यावर वाळू माफियांनी युक्ती शोधली आहे.
वाळूला सोन्याच्या भावात विकीत
गिरणा नदीपात्रांमधून वाळू उपसा करायचा आणि वाहनासोबत पावती मात्र गुजरातमधून खरेदी केल्याची जोडायची असा हा अफलातून फंडा आहे. विशेष म्हणजे ही पावती सुद्धा चुकून कोणी वाहन पकडलेच तर केवळ दाखवायला असते. यासंर्भात प्रशासन डोळ्यावर कातडे ओढून बसले आहे. वाळू माफ़िया मात्र पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाळूला सोन्याच्या भावात विकीत आहेत.
अशी केली जाते फसवणूक
या पावत्यांद्वारे महसूल बुडत असून, पर्यावरणाचीही मोठी हानी होत आहे. या गाड्यांना ट्रॅकर लागते ते दाखवविण्यासाठी स्पेशल इंडिका फिरवली जाते. यात काही स्थानिक अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याचेही बोलले जात आहे. याबाबत काही तांत्रिक बाबी देखील आहेत, त्या राजमुद्राच्या माध्यमातून समोर येतील. यात काही वाळू माफियांचे म्होरके समाविष्ठ असून ते गुजरातच्या पावत्यांचे सिंडीकेट हाताळत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मोहिमेस अपयश
तहसीलदार दावे करतात मात्र, त्यांची भूमिका संशयास्पद आहे. मोठ्या प्रमाणावर पथके नियुक्त केल्याचे सांगितले जाते. मात्र ही पथके केवळ नावालाच असून ऐनवेळी ही पथकाचे देखील संगनमताची चर्चा आहे. हे ऐवढी पथकं असतानाही जिल्हाधिकाऱ्यांच्या मोहिमेला अपयश आले आहे. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सुरु केलेल्या मोहिमेला छेद देण्याचा प्रयत्न केला जात आहे.