जळगाव: विधानपरिषदेचे आमदार चंदूभाई पटेल यांच्या आमदारकीची मुदत संपली आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतरच विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. असे असले तरी आतापासूनच जिल्ह्यात विधानपरिषदेसाठी वातावरण निर्मिती केली जात आहे. अनेक इच्छूकांनी तयारी सुरु केल्याचे दिसते. यात विशेष म्हणजे विधान परिषदेच्या आमदार पदासाठी सुरज झंवर यांना शुभेच्छा देण्यात येत आहे. त्यांच्या नावाचे मॅसेज सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.
विधानपरिषद निवडणुकीची चाहूल लागली असून, इच्छूक उमेदवारांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यात आता सुरज झंवर यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्या हितचिंतकांकडून सोशल मिडीयावर प्रचार सुरु केला आहे. या मॅसेजमध्ये सुरज झंवर यांचा भावी विधानपरिषद आमदार असा उल्लेख करण्यात आला आहे. सुरज झंवर हे बीएचआर पतसंस्थेतील मुख्य संशयतांपैकी एक असलेल्या सुनील झंवर यांचे सुपुत्र आहे.
नेमकी कुणाची वर्णी लागणार?
जिल्ह्यातील राजकीय सद्यस्थितीचा विचार केला असता, ना. गिरीश महाजन आणि ना. गुलाबराव पाटील यांच्या दोघांच्या विचारांनीच विधानपरिषदेचा पुढील आमदार ठरणार आहे. यात नेमकी कुणाची वर्णी लागणार? याबाबत काहीही माहिती नसली तरी अनेकांनी यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी केल्याचे अधोरेखीत झाले आहे.
चंदूभाई पटेल यांचा कार्यकाळ संपला
विधानपरिषदेत मनीष जैन यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक जाहीर झाली होती. तेव्हा एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक डॉ. गुरूमुख जगवाणी यांना संधी मिळाल्याने तेच या वेळेस देखील दावेदार होते. मात्र जगवाणींचे तिकिट कापून गिरीश महाजनांचे निकटवर्तीय चंदूभाई पटेल यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात विजय भास्कर पाटील हे रिंगणात उभे ठाकले होते. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार चंदूभाई पटेल हे ४२१ मतांनी विजयी झाले होते. आमदार पटेल यांचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर २०२२ रोजी संपला आहे.