गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. दीडशेहून अधिक जागांवर भाजपने विजयी आघाडी घेतलेली आहे. तर काँग्रेसची ऐतिहासिक घसरण झाली आहे. दुपारी बारा वाजेपर्यंतची आकडेवारी पाहता भाजप 154, काँग्रेस 18, आप 6 तर इतर 4 जागांवर विजयी किंवा आघाडीवर आहेत.
गेल्या 27 वर्षांपासून गुजरातमध्ये राज्यात भाजपची सत्ता आहे आणि या वेळीही त्यांनाच राज्यात पुन्हा बहुमत मिळेल हे स्पष्ट दिसत आहे. भाजपला आणखी एक टर्म जिंकण्याचा आणि गुजरातमध्ये आपला 27 वर्षांचा अखंड गड कायम ठेवण्यात यश आले आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या AAP ने गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत प्रवेश केला आणि भाजप, काँग्रेस आणि AAP यांच्यात त्रिपक्षीय लढत झाली. येथे मोठी चूरस पाहायला मिळेल असे बोलले जात होते. मात्र, भाजपने एकतर्फी राजकीय मैदान मारल्याचे दिसून येत आहे.
भाजपने नोंदविला ऐतिहासिक विजय
गुजरातमध्ये भाजप ऐतिहासिक विजय नोंदवताना दिसत आहे. मतमोजणीच्या कलानुसार, भाजपने 182 पैकी 62 जागा जिंकल्या असून 96 जागांवर आघाडीवर आहे. कलांचे निकालामध्ये रूपांतर झाल्यास 1985 मध्ये 149 जागा जिंकण्याचा काँग्रेसचा विक्रम भाजप मोडेल. आकडेवारीनुसार 1985च्या निवडणुकीत माधवसिंह सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 149 जागा जिंकल्या होत्या. 150 चा टप्पा ओलांडल्यावर भाजप आपल्या विजयाचा नवा मापदंड प्रस्थापित करेल, तसेच काँग्रेसच्या विजयाचा विक्रम मोडेल.
राहुल गांधींसह काँग्रेसच्या नेत्यांची गुजरातकडे पाठ
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरातमध्ये प्रचाराचा झंझावत सुरु असतना काँग्रेसच्या राहुल गांधींसह ज्येष्ठ नेत्यांनी प्रचाराकडेच पाठ फिरवली. काँग्रेसचे नेते नेते मोहनिसिन रथवा आणि हिमांशु व्यास यांनी निवडणुकीच्या आधी काही दिवस भाजपमध्ये प्रवेश केला. राहुल गांधी भारत जोडो यात्रेत व्यस्त आहेत. तसेच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनीही प्रचाराकडेच पाठ फिरवली, असा अप्रत्यक्ष संदेश गेला.
आपने घेतली काँग्रेसची मते
यंदा आम आदमी पार्टीने रिंगणात उडी घेतल्याने गुजरात विधानसभा निवडणुकीत रंगत निर्माण झाली होती. भाजप आणि इतर पक्षांच्या तुलनेत आम आदमी पाटीने लवकर प्रचाराला सुरुवात केली होती. 22 टक्के मतांसह आम आदमी पार्टी विरोधी पक्ष बनेल, असेही एका अंदाज सर्वेक्षणात वर्तवण्यात आला होता. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. मात्र यंदा केवळ वीसच्या आतच जागांवर काँग्रेसला समाधान मानावे लागेल. आपने काँग्रेसच्या मतांचे विभाजन केले असे आता मानले जात आहे.
पाटीदार समाजाचे भाजपला समर्थन
गुजरात विधानसभेत एकुण 182 जागा आहेत. यातील तब्बल 70 मतदारसंघांमध्ये पटेल-पाटीदार यांचे मतदान निर्णायक ठरते. गुजरातमधील एकूण 12 टक्के मतदान हे पाटीदार समाजाचे आहे. पाटीदार समाज हा भाजपचा कट्टर समर्थक आहे. मतांची टक्केवारी पाहिली तर पाटीदार समाजाचे 80 ते 85 टक्के मतदान हे भाजपला होते.