जळगाव: कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलीस अव्याहतपणे कार्यरत असतात; मात्र जळगाव जिल्ह्यातील सेवानिवृत्त पोलिसांना स्वत:च्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याची वेळ आली. वैद्यकिय सुविधा, वेतनवाढीसह विविध मागण्यासांठी सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांनी आज आंदोलन केले.
सेवानिवृत्ती पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांबाबत प्रशासनाला निवेदन दिले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करुन आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. निवेदनात केलेल्या मागण्यांमध्ये सेवानिवृत्तीनंतर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोफत वैद्यकिय सुविधा द्याव्या. 1 जुलैची वेतन वाढ लागू करावी. ३० वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांची पीएसआय पदावर पदोन्नती करा. आर्मीच्या धरतीवर टोल माफी करावी. सेवानिवृत्त पोलिसांच्या मुलांना पोलीस भरतीमध्ये २५ टक्के आरक्षण द्यावे. सेवानिवृत्तीनंतर मिळणारे आर्थिक लाभ दीड ते दोन वर्षे उशिरा मिळालेले आहेत. त्यामुळे उशिरा मिळालेल्या रकमेवरती शासन आदेशाप्रमाणे प्रचलित नियमानुसार व्याज मिळावे. मॅट कोर्टामध्ये न्यायप्रविष्ठ प्रकरणे त्वरित निर्गती होण्यासाठी ज्यादा न्यायाधीशांची नेमणूक करावी. पोलीस मतदार संघ निर्माण करावा. राष्ट्रपती पोलीस पदक सन्मानित पोलिस अंमलदारांना एसटी पीएमटी, रेल्वे, विमान प्रवासात ५० टक्के ते ७५ टक्के सुट द्यावी, अशा विविध मागण्या सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.