मुंबई : सध्याच्या डिजिटल युगात ऑनलाईन पेमेंटचे कितीही पर्याय उपलब्ध झाले असले तरी अजूनही दैनंदिन व्यवहारांसाठी रोख रक्कम बाळगण्यास प्राधान्य दिले जाते. आर्थिक व्यवहार, पैशांची देवाण-घेवाण अधिक सुरक्षित व्हावी यासाठी आर्थिक ट्रॅन्झॅक्शनशी संबंधित नियम सातत्याने कठोर करण्यात येत आहेत. त्यामुळे जाणून घेऊया रोख रकमेने व्यवहार करण्यासाठी सरकारने काय नियम बनवले आहेत.
दरम्यान घरात किती रोख रक्कम ठेवावी याबाबत काही विशेष नियम नाहीत. मात्र प्राप्तिकर विभाग तुमच्याही घरावर छापा टाकू शकतो. तुम्ही घरात कितीही रोख रक्कम ठेवली तरी ते पैसे कुठून आणले याचा सोर्स तुमच्याकडे उपलब्ध असला पाहिजे. याचा अर्थ जेवढी रक्कम तुमच्या घरामध्ये आहे, कुठून आणली याचं समाधानकारक उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे.
उत्पन्नाच्या स्रोताचे पुरावे आवश्यक
तसेच ती रक्कम कराच्या चौकटीत येत असेल तर तुम्ही त्यावरील कर भरला आहे का, यासारख्या काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. जर तुमच्याजवळ उत्पन्नाच्या स्रोताचे पुरावे असतील आणि तुम्ही त्या रकमेवरील कर भरलेला असेल तर तुम्हाला घाबरण्याचं कुठलंही कारण नाही आहे.
तर भरावा लागणार इतका दंड
मात्र जर प्राप्तिकर विभागाचं तुमच्या उत्तरानं समाधान झालं नाही आणि तुमच्याकडून सांगितल्या गेलेल्या सोर्ससंबंधित कागदपत्रांमध्ये गडबड दिसून आली. तुम्ही नियमांचं उल्लंघन केलं हे दिसून आलं तर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर दंड भरावं लागेल. तसेच तुमच्या घरामध्ये सापडलेल्या एकूण रकमेच्या 137 टक्के दंड भरावं लागेल.